'रस्त्यावर आलात तर कोरोना घरात' 

आनंद इंदानी
बुधवार, 8 एप्रिल 2020

नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यांच्या मधोमध लिहिलेले संदेश बोधक आणि मजेशीर आहेत. त्यामुळे हे संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांना अंतर्मुखदेखील करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर 'तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार' असा कोरोनाबाबत संदेश रेखाटण्यात आला आहे.

बदनापूर, ता. ८ : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच जालन्यात कोरोनाग्रस्त महिला आढळल्याने आता बदनापूर शहरात देखील मोठी दक्षता पाळण्यात येत आहे. यासाठी बदनापूर नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह महत्त्वाच्या ठिकाणांवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश लिहून जनजागृती करण्यात येत आहे. 

नगरपंचायत प्रशासनाने रस्त्यांच्या मधोमध लिहिलेले संदेश बोधक आणि मजेशीर आहेत. त्यामुळे हे संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांना अंतर्मुखदेखील करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर 'तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार' असा कोरोनाबाबत संदेश रेखाटण्यात आला आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

कोरोनापासून सावधान, महत्त्वाच्या कामाशिवाय फिरणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देणे, विनाकारण बाहेर फिरणे म्हणजे पर्यायाने स्वतःला, कुटुंबाला आणि शहराला धोक्यात घालणे होय, कोरोना ही एक अशी शर्यत आहे, ज्यात घराबाहेर धावणारा नाही तर घरात थांबणारा जिंकतो, 'घरात राहूया - कोरोना टाळूया' असे समर्पक संदेश देत जनजागृती करण्याचा अनोखा प्रयत्न नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. अर्थात, या प्रयत्नाचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

शहरात ठिकठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणीही करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक बाहेर फिरू नये, घरात थांबावे, सतत आपले हाथ आणि चेहरा साबणाने धुवावा, मास्कने नाक - तोंड झाकावे, बाहेर पडल्यावर सोशल डिस्टन्सचा वापर करावा, घरातही अंतर ठेवून बसावे, आजारी व वृद्ध व्यक्तींनी कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडूच नये, कोरोनासदृश सर्दी, ताप, घशात खवखव, श्‍वासोच्छवासाबाबत त्रास होत असल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन बदनापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रदीप साबळे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, अभियंता गणेश ठुबे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

विक्रेत्यांची भ्रमणध्वनीसह यादी प्रसिद्ध 

दरम्यान, जालना - औरंगाबाद शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. बदनापूर या दोन्ही शहराच्या मध्यभागी असल्यामुळे बदनापुरात देखील अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बदनापूर शहरात आणखी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यापूर्वी दिवसभर किराणा, भाजी व फळविक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मुभा होती; मात्र आता त्यांना सकाळी तीन तास आणि सायंकाळी दोन तास असा मर्यादित वेळ व्यवसायासाठी देण्यात आला आहे. शहरातील किराणा, फळे, भाजीपाला आणि औषधी विक्रेत्यांची भ्रमणध्वनीसह यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यांच्याशी संपर्क साधल्यास नागरिकांना घरपोच सेवादेखील मिळेल, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness about Corona in Badnapur