Bahadursing
Bahadursing

डाकू ते गांधी विचारांचा प्रचारक (व्हिडिओ)

लातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक लोकांना ठार मारलेला, कित्येक लोकांचे अपहरण केलेला, हजारो ठिकाणी दरोडे घातलेला एक कुख्यात डाकू गांधी विचारांच्या संपर्कात आला आणि त्याचे जीवनच बदलून गेले. बंदूक खाली टेकवून त्याने चक्क शरणागती पत्करली. आज तो डाकू गांधी विचारांचा प्रचारक बनला आहे.

बहादूरसिंग असे त्या प्रचारकाचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील चंबलघाटी परिसरातील. आई-वडिलांच्या निधनानंतर नातेवाइकांनी घर, शेतीवर कब्जा घेतला. त्यामुळे लहानगा बहादूरसिंग एका रात्रीत रस्त्यावर आला. भटकत-भटकत तो हरविलास नावाच्या कुख्यात डाकूच्या संपर्कात आला. त्याच्यासोबत राहिल्याने बहादूरसिंगही काही वर्षांतच घोड्यावर बसणे, बंदूक चालविणे, तलवारबाजी शिकला अन कुख्यात डाकूचा त्याचा प्रवास सुरू झाला. त्याने १०० जणांची टोळीही बनवली. या टोळीकडून होणारा रक्तपात, दरोडे यामुळे बहादूरसिंगच्या नावाची दहशत पसरली. अशा टोळीला भेटण्यासाठी गांधीवादी विचारवंत डॉ. एस. एन. सुब्बाराव गेले होते. आठ दिवस तेथे राहिले. त्या दरम्यान झालेल्या मनपरिवर्तनानंतर बहादूरसिंग यांच्यासह ६०० डाकूंनी शरणागती पत्करली. जवळपास ७८ वर्षांपूर्वीची ही कथा खुद्द बहादूरसिंग स्वत: उलगडत होते.

सुब्बाराव यांच्यामुळे मिळाली दिशा
लातूरमधील राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात मध्य प्रदेशातील काही विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत बहादूरसिंगही महोत्सवात आले आहेत. त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आपल्या वाटचालीला उजाळा दिला. आर्थिक परिस्थितीमुळे मी डाकू बनलो; पण मी जे काम करीत होतो ते किती वाईट होते, हे मला सुब्बाराव यांच्यामुळे कळले. त्यांनी मला सत्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे मी एकाच आयुष्यात दुसरे जगणे अनुभवत आहे. सुब्बाराव यांच्यासमोर जेव्हा मी शरणागती पत्करली तेव्हा मला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. शिवाय, सरकारने घर देण्याचेही कबूल केले होते. तसेच घडले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर साखर कारखान्यात २० वर्षे इमानदारीने नोकरी केली. आता गांधी विचारांचा प्रचार करीत फिरतो. फावल्या वेळात घरात नाती- पणतींसोबत खेळतो, असे त्यांनी सांगितले.

बाल आनंद मेळाव्याला सुरवात
‘‘तलवार से नफरत मिटती नहीं, प्यार से मिटती है. प्यार बांटते चलो,’’ असा संदेश गांधीवादी विचारवंत डॉ. एस. एन. सुब्बाराव यांनी दिला. नवी दिल्लीतील राष्ट्रीय युवा योजना आणि लातूरमधील विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्‌घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते रविवारी झाले. या पाच दिवसांच्या महोत्सवात महाराष्ट्रासह १८ राज्यांतील विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांच्याशी कधी गीतांतून, प्रेरणादायी गोष्टींतून डॉ. सुब्बाराव यांनी संवाद साधला. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार अमित देशमुख उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com