लातुरात उभे राहतेय बालभवन

सुशांत सांगवे
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

दोन तरुणींचा पुढाकार ः मुलांचे भावविश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न 

लातूर: तुमचे मूल मैदानावर जाऊन खेळते का, ओरिगामी-चित्रकलेत ते रमते का, त्याला सूर-तालाची ओळख आहे का, कविता-गाणी म्हणते का, मातीत हात घालून त्याने वस्तू तयार केल्या आहेत का, मंडईत जाऊन भाजी विकत आणली आहे का...? प्रश्‍न अनेक; पण यातील अनेक प्रश्नांना बहुतांश पालकांचे उत्तर "नाही' असेच असेल. त्यामुळे एकाच छताखाली मुलांचे भावविश्व समृद्ध करणारे नानाविध उपक्रम सुरू झाले तर...? नेमकी हीच गरज ओळखून पुण्याच्या धर्तीवर लातुरातही "बालभवन' उभे राहत आहे. त्यासाठी दोन तरुणींनी पुढाकार घेतला आहे. 

पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात घरातील मुलांकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळच नसतो. लातूरसारख्या शहरातील बहुतांश मुले शाळा-क्‍लास-घर या चक्राभोवतीच अडकली आहेत. त्यामुळे त्यांच्यातील कलागुण विकसित होण्याची संधीच उपलब्ध होत नाही. ती मिळावी म्हणून नुकतेच "एमएसडब्ल्यू'चे शिक्षण पूर्ण केलेल्या स्नेहा चामले आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पंचशील डावकर यांनी "बालभवन' उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला नारी प्रबोधन मंचाच्या अध्यक्ष सुमती जगताप, प्रा. अनिल जायभाये, प्रा. मयूरी सामंत यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या मदतीनेच "बालभवन' प्रत्यक्षात उतरत आहे. 

यासंदर्भात स्नेहा चामले म्हणाल्या, "बालभवन' सुरू करण्याआधी या विषयावरील वेगवेगळ्या पुस्तकांचे आम्ही वाचन केले. पुण्यातील "बालभवन'मध्ये जाऊन तेथील उपक्रमांची महिनाभर अनुभूती घेतली. या सगळ्या प्रयत्नांतून आणि अभ्यासातून "बालभवन' उभे राहत आहे. मुलांचे भावविश्व, त्यांचे बालपण समृद्ध व्हावे, हा आमचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे नारी प्रबोधन मंचने आम्हाला मोफत सभागृह उपलब्ध करून दिले आहे. मुलांनी गोष्टी तयार करून सांगणे, त्यांच्यात वाचनविषयक प्रेम वाढविणे, त्यांना हस्तकला, गाणी, नाटक, नृत्य, नाट्य शिकवणे, त्यांच्याशी आशयघन गप्पा-गोष्टी करणे, विज्ञान खेळणी तयार करायला सांगणे, शेती, बॅंक, मंडई अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जाऊन तेथील अनुभूती देणे आदी नाना उपक्रम "बालभवन'मध्ये सुरू राहतील. 

सप्टेंबरपासून प्रारंभ 
पंचशील डावकर म्हणाल्या, वाढत्या स्पर्धेमुळे मुलांचा दिवसातला बराचसा वेळ शाळा, क्‍लासमध्येच जातो. उरलेला वेळ स्मार्टफोन किंवा टीव्ही पाहण्यात जातो. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त आवश्‍यक असलेल्या ऍक्‍टिव्हिटी थांबत आहेत. मैदानी खेळ, निसर्गाशी नाते याचा मुलांशी असलेला संबंध दुरावत आहे. याची अनेक उदाहरणे आजूबाजूला पहायला मिळत आहेत. त्यामुळे चार ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. सुरवातीला आठवड्यातून दोन दिवस हा उपक्रम सुरू राहील. याचा प्रारंभ सप्टेंबरपासून होईल.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bal bhavan in latur

फोटो गॅलरी