बाजारबंदमुळे केळी उत्पादकांचे मोडले कंबरडे

Girgaon keli.jpg
Girgaon keli.jpg

नांदेड :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदी मुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील केळी, फळबाग प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने केळी, टरबूज, काशीफळ असे अनेक प्रकारचे फळपीक अर्धापूर, पार्डी, बारड, लहान, हिंगोलीमधील गिरगाव शिवारात घेतले जातात. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहे. यामुळे हजारो टन फळपिकांची विक्री अभावी नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

शंभर हेक्टर केळी शेतात अडकली 
सद्यपरिस्थितीत गिरगावमध्ये काढणीला आलेल्या केळीचे शंभर हेक्‍टर शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. आज गिरगाव मध्ये एक हजार टन केळी चा माल परिपक्व होऊन शेतामध्येच पिकत आहे. संचारबंदीमुळे व्यापारी केळीचा मालाला खरेदी करीत नाहीत. त्यामुळे केळीचा व्यापारावर परिणाम होवुन आर्थिक नुकसानाचा बळी हा शेतकरी ठरत आहे. शेतकऱ्यांनी केळीची जोपासना अतिशय चांगल्या प्रकारे करुनही पंचवीस ते तीस तीस किलोचे घड शेतकऱ्याच्या शेतातमध्ये उभे पिकत आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले झाल्याची माहिती डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील शेतकरी सुभाष अडकिणे यांनी दिली. 

अरुण नादरे यांची आठ हजार केळी शेतात
गिरगावतील सुधारित शेतकरी अरुण नादरे पाटील यांचा आठ हजार केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठ हजार रोपा पैकी फक्त दीड हजार केळीचे घड विक्री झाले. त्यानंतर कोरोना रोगाची  संचारबंदी लागू झाली. संचार बंदीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना बोलून पाहिले पण व्यापाऱ्यांचे म्हणणे असे की माल विक्री करण्यास अडचणी आहेत. संचार बंदीमुळे लोक घरामध्ये असल्यामुळे केळीला कोण घेणार, त्यामुळे आम्ही केळी खरेदी करू शकत नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे अरुण नादरे यांचे सोळा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तूमध्ये फळांचा समावेश असूनही त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले. गिरगावातील प्रत्येक केळी लागवड केलेला शेतकरी हा आर्थिक विवेचनातून व मानसिक तानातून जात आहे. 

अनेक शेतकरी आले अडचणीत
गिरगाव मधील शेतकरी गजानन रायवाडे यांची पाच हजार केळी, सुभाष रायवाडे यांच्या तीन हजार, देविदास पाटील कराळे यांच्या पाच हजार केळी, गोविंदराव नादरे दोन हजार, नामदेव साखरे चार हजार केळी असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्याकडे सरासरी दोन ते पाच हजार केळी रोपांची लागवड केली आहे. आज केळीच्या मालाला उठाव नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

टरबूजही शेतात पडून 
केळी सोबतच टरबूज, काशीफळ लागवड केलेल्या शेतकऱ्यांची पण हीच परिस्थिती आहे. मारोती नादरे यांचे दहा एकर टरबुजाची लागवड आहे. ज्ञानेश्वर, जेठनराव नादरे यांची चार एकर टरबुजाची लागवड आहे. रायवाडी बंधू यांचे जवळपास २५ एकर टरबुजाची लागवड केलेली आहे. गंगाधर जेठनराव नादरे यांची पाच एकर काशीफळाची लागवड केली आहे. असे बरेच शेतकरी आहेत ज्यांनी टरबूज, काशीफळ यांची लागवड करून आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला. पण कोरोना रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्याचे ऐवढे नुकसान करील असे शेतकऱ्याला कधीही वाटले नाही. ज्या दिवसापासून कोरोना संचारबंदी लागू झाली त्या दिवसापासून शेतकरी मानसिक तनावात आहे. लहान बाळासारखी फळपिकाची काळजी घेतली, रान डुकरापासून पिकाचे संरक्षण केले, उन्हापासून संरक्षण केले. पण आज शेतकऱ्यांची बिकट अवस्था आली आहे. डोळ्यापुढे सर्व आलेले पीक खराब होताना शेतकरी पाहत आहे. शासन दरबारी याची दखल घेण्यात यावी व संचारबंदी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा ही प्रत्येक शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com