अन्‌ खातेधारकांच्या खिशात पैसा खुळखुळायला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

औरंगाबाद - मागील आठवड्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपयांची भर पडली. प्रत्येक बॅंकेला दहा ते पंचवीस कोटी मिळाले. त्यानुसार प्रत्येक शाखेला तीस ते चाळीस लाख रुपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळाल्याने खातेधारकांच्या खिशामध्ये काही प्रमाणात पैसा खुळखुळायला सुरवात झाली.

बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीपासून तब्बल एक महिना चलन तुटवड्याचा सामना करावा लागला. बॅंकांसह एटीएमसुद्धा कोरडेठाक पडले होते. नोटाबंदीनंतर तब्बल 18 दिवस रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे आले नसल्याने औरंगाबादकरांना मोठ्या आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन टप्प्यांत अडीचशे कोटी रुपयांची स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये भर पडली. त्यानंतर बॅंकांनी पाच हजार रुपयांवरून चोवीस हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यास सुरवात केली. त्यामुळे मंगळवारपासून खातेधारकांच्या खिशात पैसे येण्यास सुरवात झाली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवरही सकारात्मक होत आहे.

आता हव्यात 100, 500 च्या नोटा
आता बॅंकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा भरणा सुरू झाला आहे. मात्र, शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा तुटवडा कायम आहे. आता रिझर्व्ह बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकांकडे आल्यास सुट्यांची चणचण दूर होईल. पैसे आल्याने शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी तब्बल 55 ते 60 कोटी रुपये ग्राहकांना दिल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय दहा ते बारा कोटी रुपये खातेधारकांनी एटीएमच्या माध्यमातून विद्‌ड्रॉल केल्याचा अंदाज आहे.

Web Title: bank rush in aurangabad