बीड: अख्ख प्रशासन झटले पण बँकर्स जागचे नाही हटले, ११ बँकांचा पीक कर्ज वाटप उद्दिष्टाला खो

दत्ता देशमुख
Sunday, 6 December 2020

पीक कर्जासाठी खेटे मारुनही बँकांच्या नकारामुळे रिकाम्या हाताने परतणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठपुरावा केला.

बीड : पीक कर्जासाठी खेटे मारुनही बँकांच्या नकारामुळे रिकाम्या हाताने परतणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठपुरावा केला. महसूलसह सहकार विभाग कामाला लावला. परंतु, ११ बँकांनी ठरवून दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केलेच नसल्याचे समोर आले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी सुरुवातीला साडेतेराशे कोटींवर पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, बँकर्सनी यात खेळी करत हे उद्दिष्ट ९५० कोटींवर आणले. तर, रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट २४० कोटींचे होते. जिल्ह्यातील दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम अडचणीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटावे यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुरुवातीपासून हा विषय अजेंड्यावर घेतला.

अगदी गावोगावी मेळावे घेऊन पीक कर्ज मागणीचे अर्ज भरुन घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनीही खुद्द पीक कर्ज वाटपाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नियमित बैठका घेतल्या. खरीप हंगामात बँकांनी कमी करुन घेतलेल्या एकूण उद्दिष्टाची पूर्ती झाली असली तरी यात ११ बँकांनी हात आखडलेलाच आहे. खरिपात हात आखडणाऱ्या या बँकांनी रब्बीतही पहिले पाढे पंचावन्न अशीच कामगिरी केली. एकूण १६ बँकांपैकी पाच बँकांनी मात्र उद्दिष्टाएवढे कर्ज वाटप केले आहे. खरिपात एकूण एक लाख ६० हजार शेतकऱ्यांना १०१५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर, रब्बी हंगामासाठी ३४ हजार ८२४ शेतकऱ्यांना २६२ कोटी ५२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप केल्याने एकूण उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले.

 

आणखी लाड करणार की कारवाई
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, ॲक्सीस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व डीसीबी बँक या ११ बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा, सुचनेनंतरही पीक कर्ज वाटपाचे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे यातील सहा बँकांचे वाटप तर पन्नास टक्क्यांहून कमी आहे.

पंजाब नॅशनलची नामी शक्कल
पंजाब नॅशनल बँकेने दोन्ही हंगामाचे पीक कर्ज वाटप उद्दिष्टपूर्तीचा रकाना भरण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. खरीप हंगामात सात कोटींचे उद्दिष्ट असताना केवळ एक कोटी ८३ लाख रुपये वाटप केल्याने उद्दीष्टाच्या २६ टक्के वाटपाची नोंद झाली. मात्र, रब्बी हंगामात केवळ एक कोटींचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी एक कोटी सहा लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks Not Distribute Crop Loan In Beed District