बापरे, सततच्या पावसाने विहीर २० फुटापर्यंत खचली

 vihir
vihir

मानवत ः तालुक्यात मागील आठ दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे विहीर वीस फूट खोल खचल्याची घटना तालुक्यातील पाळोदी शिवारात घडली. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने जीवित हानी टळली. 

रामेश्वर मारोतराव काकडे यांची पाळोदी शिवारातील गट क्र.१२२ मध्ये शेती आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी ६० फूट खोल विहीर बांधकाम केले होते. विहिरीला चांगले पाणी असल्याने काकडे यांनी आपल्या शेतात ४२५ संत्र्यांच्या झाडाची लागवड केली होती. १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री परिसरात ढगफुटी झाली होती. या पावसामुळे काकडे यांच्या शेताजवळील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे शेत आखाड्यावरील विहीर २० फुटांपर्यंत खाली खचली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने जीवित हानी टळली. शेतकऱ्याने मंगळवारी (ता.२२) तहसीलदाराना निवेदन देऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. 

दुधना नदीचे पाणी घुसले शेतात 
मानवत ः निम्नदुधना प्रकल्पाच्या पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्याने नदी काठावरील शेतात पाणी घुसून तालुक्यातील नऊ गावांतील दोन हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने पंचनामा सुरू केले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यातील गोगलगाव, मगर सावंगी, इरळद, मंगरूळ (पा.प.), नरळद, नीलवर्ण टाकळी, कोथाळा, पार्डी, शेवडी जहांगीर या नऊ गावांच्या शिवारातून दुधना नदी वाहते. साधारणपणे तालुक्यांची १२ किलोमीटर लांबीचे दुधना नदी आहे. मागील काही दिवसांपासून निम्नदुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी नदीकाठच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नऊ गावांतील अंदाजे दोन हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहे. यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनला कोंब फुटत असून कपाशी वाऱ्याने आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या घास हिरावला जाणार आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक आदींनी बुधवारी पंचनामा करण्यास सुरवात केली आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

चार दिवसांपासून पुलावरून वाहतेय पाणी 
 जिंतूर ः सरलेल्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील नद्या, ओढे, नाल्यांना दोनतीन वेळ पूर आला असल्याने काही ठिकाणी नदीकाठच्या गावांत, शेतशिवारात पुराचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांच्या पात्रातील पुलाबरोबर पाणी अजूनही वाहत आहे. असेच चित्र तालुक्यातील जिंतूर-पाचलेगाव-निवळी रस्त्यावर दिसत आहे. शनिवारी (ता.१९) तालुक्यात जवळपास दीड तास सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या रस्त्यावरील बलसा ते पाचलेगाव दरम्यानच्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे नदीच्या पुलावरून दीड दोन फूट पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे पाचलेगाव, निवळी, चिंचोली, जांब या गावांसह परिसरातील वाड्या वस्त्यांचा शहराशी संपर्क तुटला होता. तो पुराचे पाणी कमी झाल्याने दोन दिवसांपासून हळूहळू पूर्वस्थितीत येत आहे. परंतु, अजूनही (ता.२३) या पुलावरून एक फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, दूधविक्रेते यांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. पाचलेगावी मुक्तेश्वर आश्रम परिसरातही पाणी साचलेले दिसत आहे. 

लोअर दुधना धरणाचे चार दरवाजे उघडले 
सेलूः तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरणाचे बुधवारी (ता.२३) सकाळच्या सुमारास चार दरवाजातून अर्धामीटरने सात हजार १०२ क्युसेकने दुधना नदीपात्रात पाण्यात विसर्ग सोडण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात सर्वदूर सतत पाऊस पडत असल्याने लोअर दुधना प्रकल्प धरणाचे दोन दिवसांपूर्वी चौदा दरवाजांचे उघडून दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे काहीकाळ सेलू शहराचा इतर शहरांशी संपर्क तुटला होता. बुधवारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातून सात हजार १०२ क्युसेकने दुधना नदीपात्रात पाण्यात विसर्ग करण्यात आला. त्या पाण्यामुळे सेलू-राजवाडी-वालूर रस्त्याच्या पुलावरून सकाळपासून पाणी जात असल्यामुळे हा रस्ता बंद असल्याने सेलू ते वालूर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.  


पंचनामे सुरू केले 
नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे सुरू केले आहे. बाधित शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. 
- डी.डी.फुपाटे, तहसीलदार, मानवत. 

शासनाने नुकसानभरपाई द्यावी
या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या घास हिरावला गेला आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. 
- अंकुश बारहाते, शेतकरी, इरळद. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com