ना रस्ते, ना ड्रेनेज, नुसतेच उंच उंच बंगले

सुषेन जाधव
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

  • नक्षत्रवाडी, कांचनवाडी, ईटखेडा भागात समस्यांचा डोंगर 
  • आठवडे बाजार, महापालिकेच्या दवाखान्याची मागणी 

औरंगाबाद : डोंगर परिसरात हवेशीर वातावरणात राहणे नागरिकांनी पसंत करीत ईटखेडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी भागात उंचच उंच बंगले, घरे घेतली. कोणी किरायाने राहतात; परंतु आजवर या भागातल्या मूलभूत समस्या संपल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त आहेत. 

ईटखेडा भागात मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती झाल्या आहेत; मात्र काही ठराविक रस्ते आणि काही भागांतील बऱ्यापैकी पाण्याची स्थिती सोडली तर तिन्ही भागांत शेवटच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ते, स्ट्रीट लाइट, पाणी, ड्रेनेजलाइन या प्रमुख समस्या आहेत. काही लेआऊटमध्ये असणाऱ्या ड्रेनेजलाइन ब्लॉक झालेल्या आहेत. नाथ व्हॅली शाळा ते कांचनवाडी या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सिमेट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्याची वर्षभरातच दोन-तीन वेळेस दुरुस्ती करण्यात आली आहे. 

देवळाईहून साताऱ्याला जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण फक्त चोपडे वस्तीपर्यंतच झाले आहे. एखाद्याला नक्षत्रवाडी, कांचनाडी आणि ईटखेडा, जवाहर कॉलनी किंवा शहानूरमियॉं दर्गा बाजाराकडे जाण्यासाठी सातारामार्गे जवळ आहे, चोपडे वस्तीपासून सातारा मंदिरापर्यंत खूपच खराब आहे. चालत जाणेही मुश्‍किल झाले आहे. 

आठवडे बाजाराची मागणी 
नक्षत्रवाडी, कांचनवाडी आणि ईटखेडा भागातील नागरिकांना भाजीपाल्यासाठी हायवेवरून जावे लागते, तर दुसरीकडे कांचनवाडी येथे भाजीविक्रेते हायवेवर भाजीपाल्याच्या गाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे तिन्ही परिसरांना फायदा होईल यादृष्टीने एखाद्या दिवशी आठवडे बाजार भरविण्याची मागणी होत आहे. कांचनवाडी येथे उघड्यावरच मटन मार्केट असल्याने तिथेच गर्दी होते. जवळच गटारी वाहतात. त्यामुळे कायम दुर्गंधी असते. 

मोठ्या पावसात रस्ताच होतो बंद 
या तिन्ही गावांत कोठेही खेळण्यासाठी मैदान नाही. 11 ते 12 मजल्यांवर बंगले झाले; मात्र पायाभूत सुविधा नाहीत. नवीन झालेल्या विधी विद्यापीठाकडे जाणारा रस्ताही खूप खराब आहे. सैनिकी शाळेजवळ असलेल्या पुलाला मधोमध भगदाड पडले आहे. विधी विद्यापीठात जाणाऱ्या तसेच निवासी सैनिकी शाळेला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही इथून ये-जा करावी लागते. 

रहदारीला अडचण 
बिडकीन, पैठणला जाणाऱ्यांना कांचनवाडी येथे कायम गर्दीचा सामना करावा लागतो. महानुभाव चौक ते रिंग रस्त्यापर्यंत (नगर हायवे) चौपदरीकरण झाले; मात्र तिथून नक्षत्रवाडी, कांचनवाडीपर्यंत चौपदरीकरण नसल्याने सीएसएमएसएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही गर्दीतून वाट काढावी लागते. तसेच या भागात रिव्हरडेल स्कूल, नाथ व्हॅली स्कूल, अग्रसेन शाळा असल्याने शाळेच्या बस आणि गर्दीची वेळ एकदम जुळून येत असल्याने कोंडी असते. 

खड्डे दिसत नाहीत का? 
रेल्वेस्थानक चौकात होणारी वाहतूक कोंडी कायम असते. महत्त्वाचे हे की, या उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळस म्हणजे बडे नेते, उद्योजक रोज याच उड्डाणपुलावरून ये-जा करतात, मग कोणालाच खड्डे दिसत नाहीत का? 

सामान्य कुटुंबातील लोकांना या भागात किरायाने राहणे परवडते, तसेच कामाची ठिकाणेही जवळ आहेत; मात्र मूलभूत सुविधा नाहीत. नाल्यांच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आजारी पडल्यास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाणे परवडत नाही. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्याची गरज आहे. 
- सुधाकर जाधव, रहिवासी, कांचनवाडी 

महापौरांच्या वॉर्डात सर्व सुविधा आहेत. त्यांनी आमच्या भागात घर घेतले असते, तर सर्व सुविधा मिळाल्या असत्या. 
- पद्माबाई जवळकर, ईटखेडा परिसर 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: basic need incomplete in Nakshatrawadi, Kanchanwadi & Itkheda