बीडला रंगणार क्षीरसागर काका-पुतण्याची लढाई?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

नगर जिल्ह्यापाठाेपाठ जर कुठल्या जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा हाेत असेल तर ताे जिल्हा म्हणजे बीड हाेय. महाराष्ट्रातील अनेक मतदार संघात काका-पुतण्यांची लढाई रंगत आहे. ताेच संघर्ष आता बीड मतदारसंघातही पाहायला मिळेल.

 

बीड : नगर जिल्ह्यापाठाेपाठ जर कुठल्या जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा हाेत असेल तर ताे जिल्हा म्हणजे बीड हाेय. महाराष्ट्रातील अनेक मतदार संघात काका-पुतण्यांची लढाई रंगत आहे. ताेच संघर्ष आता बीड मतदारसंघातही पाहायला मिळेल.

दरम्यान, जिल्ह्यातील गेवराई, परळीपाठोपाठ आता बीड मतदारसंघातही काका-पुतण्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. गेली १० वर्षे बीडची आमदारकी भूषवणारे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला. मंत्रिपदही मिळवले. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जयदत्त यांच्यासमोर त्यांचेच पुतणे संदीप यांना उभा करण्याची रणनिती आखली आहे.

दरम्यान, २०१४ मध्ये भाजपकडून लढून पराभूत झालेले आमदार विनायक मेटे याही वेळी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. २०१४ मध्ये सर्वत्र भाजपची लाट असताना बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची लाज राखली हाेती. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी क्षीरसागर कुटुंबातच फूट पाडल्याने ते नाराज झाले आणि लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर भाजपला उघडपणे मदत केली.

युतीत बीड मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी भाजपच्या संमतीने शिवबंधन बांधले. अनेक वर्षांपासून बीड पालिकेसह अनेक सहकारी संस्था क्षीरसागरांच्या ताब्यात आहेत. मतदारसंघात दांडगा जनसंपर्कही आहे. गेल्या ५ वर्षांत संदीप यांनीही तरुणांची चांगली फळी जमवली. संदीप यांची देखील जनमाणसांत चांगली प्रतिमा आहे. त्यांनी देखील कार्यकर्त्यांचे माेठे जाळे तयार केले आहे.

आपल्याच काकाच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. संदीप यांचा गट बीड पालिकेत विराेधी बाकावर आहे. तिथेही काका- पुतण्या वादाचे पडसाद उमटत असतात. गेल्या वेळी भाजपकडून लढलेले शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे या वेळीही इच्छुक आहेत. मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे फारसे सख्य नाही. मात्र क्षीरसागर सेनेत आल्याने मेटेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्हच आहे. वंचित आघाडी लाेकसभेप्रमाणे विधानसभेलाही आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या तयारीत आहे.

मतदारसंघातील समस्या -
बीड शहरात पाणीटंचाईची समस्या आहे. अनेक गावांत सिंचनाचा स्रोत नाही. सततच्या अवर्षणामुळे स्थलांतरात वाढ. यासह ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्याच्या समस्या कायम आहेत. अनेक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत पायाभूत सोयी-सुविधांसह कर्मचाऱ्यांची वानवा आहे. अमृत पेयजल योजनेचे काम कासवगतीने होतेय. याशिवाय एकही माेठा उद्याेग नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागात विजेची अनुपलब्धता, रोहित्र वेळेवर उपलब्ध न होणे या समस्या नित्याच्या आहेत.

संभाव्य उमेदवार  -
शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर हे उमेदवार असणार आहेत. यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख निझाम तयारीत आहेत. युती न झाल्यास भाजपकडून राजेंद्र मस्के, आघाडी न झाल्यास काँग्रेसकडून सुरेश नवले, सिराजोद्दीन देशमुख यांची नाव चर्चेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the Battle between Kshirsagar Uncle nephew in beed