सावधान! ऑनलाईन व्यवहार करताना अशी होते फसवणूक

Be careful when shopping online
Be careful when shopping online

औरंगाबाद - आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, "मी अमुक बॅंकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्‍स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.'' यावर विश्‍वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्यावेळातच मोबाईलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्‍कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. हा काय प्रकार लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा प्रकारचे अनेकांना फोन आलेले असू शकतात. हा प्रकार आहे सायबर क्राईममधील एटीएम फ्रॉडचा. 

फिशिंग या सायबर क्राईम प्रकारात फिशिंग म्हणजे मासे पकडण्यासाठी ज्या प्रकारे पाण्यात जाळे टाकावे लागतात त्याचप्रमाणे असे गुन्हेगार खोट्या मात्र हुबेहूब वाटणाऱ्या वेबसाइट सोशल मीडियावर लिंक करतात. त्यामुळे लोकांना ती वेबसाइट खरीच आहे असे वाटते आणि लोक त्या वेबसाइट उघडतात आणि येथेच फसतात. त्यावर ऑर्डर देताना स्वत:ची सर्व माहिती सायबर गुन्हेगारांना देऊन टाकतात.

जर कार्डद्वारे बिल अदा केले तर आपल्या बॅंक खात्यामधील पैसे काही सेकंदांत काढले जातात आणि आपण समजतो मी पैसे काढले नाही, मी कार्ड वापरले नाही, तर माझ्या खात्यामधून पैसे कुणी काढले? गुन्हेगार पैसे काढत असतो आणि एसएमएस आपल्याला येतात. फिशिंग या सायबर गुन्ह्यांत लोकांना फसवून त्यांची व्यक्तिगत माहिती बॅंक अकाउंट, क्रेडिट कार्डची माहिती मिळविली जाते व या माहितीच्या आधारे लोकांना लुटले जाते. 

ऑनलाइन गंडा 

ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ऑनलाइन गंडा घालणे सायबर गुन्हेगाराला एका हाताने टाळी वाजविण्याइतके सोपे झाले आहे. इंटरनेटवर शेकडो ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आहेत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्याचे लोकांना जणू व्यसन लागले आहे.

डॉ. संजय शिंदे म्हणाले, की ऑनलाइन गंडा घालण्याच्या सायबर गुन्ह्यामध्ये कोणी कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एखादी वस्तू खरेदी करीत आहेत. खरेदी केल्यावर कार्डद्वारे, नेटबॅंकिंगच्या माध्यमातून पैसे देखील देतात; मात्र अशा फसवणूक प्रकारात शॉपिंग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू येते. ऑनलाइनद्वारे फोन विकत घेतला; मात्र घरी आल्यावर त्यात साबण निघत असतो. मागितलेल्या वस्तू न देता दुसऱ्याच वस्तू, खराब वस्तू देणे, पैसे परत न करणे याला ऑनलाइन गंडा घालणे असे म्हणतात. 

ई-वॉलेट वापरा; पण जपून 

हल्ली बहुतांशजणांच्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट वापरले जातात, पैशांच्या हस्तांतरणासाठी वापर केला जात आहे; परंतु ऐनवेळी व्यवहार झाला नाही तर मग आपण असा प्रयत्न करतो, की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकते. सर्च इंजिनवर पूर्वी प्रमुख कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; मात्र आता तर गॅस एजन्सी, कुरिअर एजन्सींचेही नंबर इंटरनेटवरील सर्च इंजिनवर असतात. त्यात एडिटींगची सोय असते.

आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक घुसवतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचे संपर्क क्रमांक मिळतात. ऑनलाइन व्यवहार करताना युजर्सचे व्यवहार अयशस्वी झाले तर ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलसारख्या सर्च इंजिनवरून मिळवितात.

युजर्स असे नंबर सर्च करतात हे भामट्यांना माहितीच असते. अर्थात, ते सर्च ऑप्टमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो.

ते बोलताना असे वाटते, की तो कस्टमर केअरचा प्रतिनिधीच आहे. त्यावर विश्‍वास ठेवून भामट्यांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी युजर्स करीत जातो. त्यात दहा रुपयांचा व्यवहार असो की भामट्याने सांगितलेल्या धोकदायक लिंकवर जाणे असो. सर्व गोष्टी फॉलो केल्या की फॉलो करणाऱ्याच्या ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला जाते.

भामटे समोरच्याला फोनवर संभाषण करीत असतानाच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा रुपयांचे किंवा अन्य कितीही रुपयांचे ट्रान्झेक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या सूचना फॉलो करणाऱ्याचा डाटा मिळतो. त्यानंतर ते भामटे ऑनलाइन ट्रान्झेक्‍शन करून मोकळे होतात. 

अशी करा खात्री

  • इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे का, नाही याची खात्री करायला हवी. 
  •  गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाइटवरूनच घेतले की नाही याचीही खात्री करावी. 
  •  एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळविल्यानंतर तो त्याच व्यक्तीची आहे का, हे तपासावे. 
  •  फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे. 
  •  भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. विशेषत: दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाइटचीही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा
  • आपणास हव्या असलेल्या वेबसाइट योग्य आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. 
  •  सायबर गुन्हेगार शक्‍यतो सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान आपल्याला फोन करीत असतात. त्यामुळे असे फोन आल्यास स्वतः बॅंकेत जाऊन विचारपूस करणे अधिक योग्य आहे.
  • त्याचप्रमाणे आपली बॅंकेची, कार्डची माहिती फोनवर किंवा अनोळखी व्यक्तीला देणे टाळणे व होता होईल तेवढे व्यवहार चेक किंवा रोखीने करावेत. 
  •  आपण खरेदी करीत असताना आपले कार्ड अनेक ठिकाणी स्वॅप करीत असतो. त्यामुळे आपल्या कार्डची कॉपी व पिनची कॉपी होण्याची जास्त शक्‍यता असते. त्यामुळे कार्डद्वारे केले
  • जाणारे व्यवहार जागरूकपणे करणे कधीही फायद्याचे आहे. 
  •  सायबर गुन्ह्यांत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे. क्रेडिट नंबर क्रेडिट कार्डधारकाची सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन खरेदी करणे, क्रेडिट कार्डचे
  • नंबर व घटकांविषयी माहिती दुसऱ्या व्यक्तीला, गुन्हेगारांना देणे टाळावे. 
  •  सायबर गुन्हेगार हा इंटरनेटवर ऑनलाइन असतो; तसेच फिशिंग या सायबर गुन्ह्यामुळे आपली वैयक्तिक माहिती त्याच्याकडे असते. अमुक बॅंकेच्या मुख्यालयातून बोलतोय तासाभरात
  • तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड बंद पडणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल तर व्हेरिफिकेशन करावे लागेल, असे फोन आले तर विश्‍वास ठेवू नका. बॅंका असे फोन कधीच करीत नाहीत. 

आजचे गुन्हेगार हे हायटेक झाले आहेत. ते गुन्हा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. गुन्हे करण्यासाठी त्यांना गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाण्याची मुळीच आवश्‍यकता नाही. ते जगातील कोणत्याही कोपऱ्यातून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणालाही त्यांच्या गुन्ह्याची शिकार बनवू शकतात. अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये बॅंकिंगसाठी संबंधित गुन्ह्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. या कॅशलेशच्या मानसिकतेमुळे त्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 
- डॉ. संजय शिंदे, सायबर क्राईमचे अभ्यासक 
 

डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाइट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता; पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाइटवरून खरेदी करा. रिव्ह्युव्ह, कॉमेंटस, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा, वेबसाइटचा मालक शोधा. 

- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्‍तालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com