esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज राहा, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटकांनी सज्ज राहावे. पूर्वतयारी म्हणून कोरोनाचा प्रसार करणाऱ्या सुपर स्पेडर्सची तपासणी करण्यासोबत संशयित व्यक्तींची तपासणी वाढवावी.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सज्ज राहा, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटकांनी सज्ज राहावे. पूर्वतयारी म्हणून कोरोनाचा प्रसार करणाऱ्या सुपर स्पेडर्सची तपासणी करण्यासोबत संशयित व्यक्तींची तपासणी वाढवावी. कोणत्याही आजाराची थोडेही लक्षणे आढळलेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यावर भर द्यावा. कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांत तडजोड होऊ देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. १९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, डॉ. श्रीधर पाठक उपस्थित होते. श्रीकांत म्हणाले, ‘‘कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही लाट पूर्वीपेक्षा जास्त हानिकारक ठरू शकते. यामुळे सरकारी यंत्रणांना पू्र्वीपेक्षा अधिक सक्षमपणे काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. पूर्वतयारी म्हणून भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा दुकानदार आदी सुपर स्पेडर्संची नियमित कोरोना तपासणी करावी.

तपासणीची संख्या वाढवावी. सध्या गृहविलगीकरणाचा पर्याय चांगला ठरत असला तरी त्यावरील नियंत्रण वाढवण्याची गरज आहे. हा पर्याय कोरोना प्रसाराचे कारण ठरू नये, याचीही काळजी घेण्याची गरज आहे.’’ जिल्हयात २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी, दहावीच्या शाळा व अकरावी बारावी कनिष्ठ महाविद्यालय सुरू होत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील उणिवा व कमतरता दूर करून यंत्रणा अधिक सक्षम करावी. औषधाचा मुबलक साठा व व्हेटिंलेटरची सुविधा पुरेशा संख्येने तयार ठेवाव्यात, आदी सूचनाही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी बैठकीत दिल्या. बैठकीला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व नोडल अधिकारी उपस्थित होते.

Edited - Ganesh Pitekar