पदवीधरच्या निकालाचा बीड ठरणार केंद्रबिंदू; महाविकास आघाडी, भाजपपुढेही आव्हान

दत्ता देशमुख
Saturday, 21 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत खरी रंगत बीड जिल्ह्याने आणली आहे. या निवडणुकीच्या निकालाचा केंद्रबिंदूही बीडच ठरणार असल्याचे चित्र आहे.

बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत खरी रंगत बीड जिल्ह्याने आणली आहे. या निवडणुकीच्या निकालाचा केंद्रबिंदूही बीडच ठरणार असल्याचे चित्र आहे. नाराजी, बंडखोरी यामुळे आता प्रमुख दोन्ही पक्षांसमोर बीड जिल्ह्यातच आव्हान आहे. महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर, महायुतीकडून भाजपचे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी आहे. मात्र, या लढतीत भाजपमधून बंडखोरी करुन उमेदवारी कायम ठेवणारे रमेश पोकळे यांनी चांगलीच रंगत आणली आहे. या बंडखोरीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन पक्षांतील नाराजी नाट्याचा कोणाला फायदा आणि तोटा होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

आमदार सतीश चव्हाणांच्या दोन - तीन दौऱ्यांत ते महाविकास आघाडीचे की केवळ राष्ट्रवादीचे उमेदवार असे चित्र दिसले. सुरुवातीपासून शिवसेनेने अंतर राखले आहे. बुधवारच्या सभेवेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी हजर नव्हते. पदवीधर मतदारांमध्ये क्षीरसागरांच्या अधिपत्याखालील संस्थांत शिक्षकांची संख्या मोठी आहे. या सभेत काँग्रेसचे काही पदाधिकारी हजर असले तरी माजी खासदार रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी असे नेते अद्याप दुरच आहेत. आता ही नाराजी दूर करण्याचे आव्हान सतीश चव्हाणांसमोर आहे. महायुतीच्या शिरीष बोराळकरांच्या प्रचारार्थ पहिली बैठक झाली पण ती फक्त भाजपचीच. शिवसंग्राम, रिपाईं यांचा रोल अद्याप क्लिअर नाही.

शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटेंनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांचा बोराळकरांच्या बॅनरवर अद्यापतरी फोटेा नाही. विशेष म्हणजे बीडच्याच बैठकीत पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडेच हजर नव्हत्या. लातूर जिल्ह्यांतील बैठकांच्या बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंचे फोटो टाळल्याने भाजप समर्थकांनी सोशल मिडीयावरुन संताप सुरु केला आहे. या निवडणुकीबाबत जिल्ह्यात मुंडे भगीनींनी अद्याप तरी जाहीर कार्यक्रम घेतलेला नाही. शिवसंग्राम - रिपाईंला भाजप सोबत घेणार का, पुन्हा स्वत:ची ताकद दाखविणार हे पहावे लागणार आहे. तर या निवडणुकीत भाजपचे बंडखोर रमेश पोकळे यांच्या उमेदवारीनेही ट्विस्ट वाढले आहे.

त्यांनी मुंडेंच्या आशिर्वादाने संघर्षाची हाक दिली आहे. त्यांच्या दौऱ्यांत भाजप कार्यकर्ते सोबतीला असून सोशल मिडीयावरुनही भाजप समर्थक पोकळेंचे गुणगान गात आहेत. विशेष म्हणजे स्थानिक भाजपने अद्याप तरी पोकळेंच्या विरोधात कुठले स्टेटमेंट दिलेले नाही. पोकळेंमुळे जिल्ह्यात जेवढा भाजपला फटका बसणार तेवढाच सतीश चव्हाणांनाही बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यातच भाजपला रामराम ठोकणारे जयसिंगराव गायकवाड यांची जन्मभूमी आणि राजकीय कर्मभूमी बीड जिल्हाच आहे. या मतदार संघाचे दोनदा प्रतिनिधित्व करणारे गायकवाड याच जिल्ह्यातून तीनदा खासदार राहिलेले आहेत. कार्यकर्त्यांचे जाळे नसले तरी ते खारीचा वाटा उचलणार यात शंका नाही. एकूणच गोळा बेरीज केली तर आठ जिल्ह्यांचा मतदार संघ असलेल्या या निवडणुकीत बीडच्या घडामोडीच महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे सहाजिकच बीडच या निकालाचा केंद्रबिंदू राहणार यात शंका नाही.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Centre Point Of Aurangabad Graduate Election Results