हत्तींच्या पिंजऱ्यात अस्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

हेमलकसा येथून जोडी आणण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न 

औरंगाबाद- महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात असलेले दोन हत्ती गेल्या वर्षी विशाखापट्टणम येथील जंगलात सोडण्यात आले. हत्तींसाठी असलेल्या जागेत येत्या काही दिवसांतच पर्यटकांना अस्वलांची जोडी दिसणार आहे. महापालिकेने हेमलकसा येथून अस्वलांची जोडी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यापूर्वी या पिंजऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी दहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय अपुऱ्या जागेमुळे अडचणीत सापडले होते. सफारी पार्क विकसित करण्याच्या अटीवर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाची मंजुरी एका वर्षाने वाढवून दिली आहे. एकीकडे सफारी पार्कसाठी पाठपुरावा सुरू असताना दुसरीकडे प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हेमलकसा येथील आनंदवनात अस्वलांची जोडी आहे.

हे अस्वल महापालिकेला देण्याची तयारी आनंदवनाने दर्शविली आहे. त्यानुसार आता हेमलकसा येथून अस्वलांची जोडी आणली जाणार आहे. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात हत्तीच्या जोडीला राहण्यासाठी ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ही अस्वलांची जोडी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यानुसार काम हाती घेण्याच्या सूचना मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bear in elephant cage