औरंगाबाद : गाणे गाण्यावरून डॉक्‍टरांत मारामारी, अश्‍लील शिवीगाळही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

शहरात कान-नाक-घसा याविषयी परिषद होती. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून डॉक्‍टर शहरात आले होते. परिषदेदरम्यान शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभ ठेवण्यात आला होता. 

औरंगाबाद - डॉक्‍टरांची कान-नाक-घशाबाबत औरंगाबादेत नुकतीच परिषद झाली. या परिषदेनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये एक समारंभ ठेवण्यात आला. यात डॉक्‍टरांची गाणे गाण्यावरून हमरीतुमरी अन्‌ मारहाण झाली. हा प्रकार 30 नोव्हेंबरला घडला. या प्रकरणी चार डिसेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

शहरात कान-नाक-घसा याविषयी परिषद होती. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून डॉक्‍टर शहरात आले होते. परिषदेदरम्यान शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभ ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक डॉक्‍टरमंडळींनी 30 नोव्हेंबरला रात्री हजेरी लावली होती. कार्यक्रमात राहुल रामगोपाल सोनी (वय 35, रा. गारखेडा परिसर) हेही उपस्थित होते. त्यांचे सासरे डॉक्‍टर असल्याने त्यांच्यासोबत ते पंचतारांकित हॉटेलमध्ये आले होते.

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

हॉटेलबाहेरील लॉबीमध्ये राहुल यांचे डॉक्‍टर सासरे व डॉ. सचिन निळाखे (रा. सांगली), डॉ. विल्सन देसाई (रा. सांगली) व त्यांच्या पाच-सहा साथीदारांमध्ये गाणे गाण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन अश्‍लील शिवीगाळ व मारहाण झाली. यानंतर धमकावण्यात आले, अशी सोनी यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक डी. आर. नलावडे करीत आहेत. 
  
शहरातून दोन दुचाकींची चोरी 
औरंगाबाद : सागर सोमीनाथ गायकवाड (रा. म्हाडा कॉलनी) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना महावीर चौकाजवळील म्हाडा कॉलनीत नुकतीच घडली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मनोज प्रल्हाद गायकवाड (रा. जटवाडा रोड) यांची दुचाकी चोराने जिल्हा न्यायालयासमोरील पार्किंगमधून चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी (ता. चार) साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वेदांतनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
रहदारीला अडथळा; फळविक्रेत्यांवर गुन्हे 
औरंगाबाद : रस्त्यात हातगाडी लावून रहदारीला अडथळा आणल्याप्रकरणी फळविक्रेत्यांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. चार) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. जगन्नाथ भवाळ यांनी व राजू कुंडलिक भवर यांनी त्यांच्या फळांच्या हातगाड्या गुलमंडी चौकाजवळ लावल्या. त्यामुळे त्यामुळे रहदारीला अडथळा झाला. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या. 

हेही वाचा ः उपाययोजना बंद, अपघात सुरू 

तरुणाला मारहाण करून लुबाडले 
औरंगाबाद : तरुणाला मारहाण करून लुबाडल्याची घटना बुधवारी (ता. चार) बीएसएनएल कार्यालयासमोर, सिडको एन-5 येथे घडली. याबाबत प्रवीण सखाराम पवार (वय 26, रा. जयभवानीनगर) यांनी तक्रार दिली. ते मित्राला भेटून घरी परत जाताना बालाजी प्रल्हाद सरकाळे (वय 30, रा. बीड बायपास रोड) याने प्रवीण यांना मारहाण करून अकराशे रुपये लुबाडून दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beaten Between Two Doctor's At Aurangabad