उपाययोजना बंद, अपघात सुरूच!

अनिल जमधडे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

गेल्या नऊ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे अपघात झाले. त्यामध्ये चारशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 442 अपघातांत 163 जणांचा मृत्यू झाला. तर ग्रामीण औरंगाबादेत 425 अपघातांत 253 जखमी झाले आहेत. एकूण अपघातांत सहाशेपेक्षा अधिक जखमी झालेले आहेत. 

औरंगाबाद - मान शरमेने खाली जावी अशा आकडेवारीत म्हणजे अपघाताच्या प्रमाणात राज्यात औरंगाबाद शहराचा वरचा क्रम आहे. सर्वाधिक अपघातांचे शहर म्हणून औरंगाबादचे नाव आहे. गेल्या नऊ महिन्यांत आठशेपेक्षा अधिक अपघात झाल्याने तातडीच्या उपाययोजना आवश्‍यक आहेत. असे असले तरीही संबंधित यंत्रणा मात्र बेफिकीर असल्याचे भीषण वास्तव आहे. 
लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांचीही संख्या भरमसाट वाढत असल्याने, रस्ते अपघात हा दररोज चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या नऊ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे अपघात झाले. त्यामध्ये चारशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 442 अपघातांत 163 जणांचा मृत्यू झाला. तर ग्रामीण औरंगाबादेत 425 अपघातांत 253 जखमी झाले आहेत. एकूण अपघातांत सहाशेपेक्षा अधिक जखमी झालेले आहेत. हे प्रमाण चिंताजणक असल्याने परिवहन विभागाने शहराचे नाव लाल यादीत टाकले आहे. 

हेही वाचा  ; सीसीटीव्ही बंद ठेऊन फिटनेस तपासणी , आरटीओची प्रक्रियाच संशयास्पद 
काय आहे ब्लॅक स्पॉट? 
अपघाताच्या अनुषंगाने आरटीओ, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रणव क्षेत्र) निश्‍चित केले जातात. जिथे जास्त अपघात होतात, तो परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जातो. राज्यात 1 हजार 364 ब्लॅक स्पॉट आहेत. त्यापैकी 276 ब्लॅक स्पॉट हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात. औरंगाबाद जिल्ह्यात शहर व परिसरातील 85 ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. तब्बल तीन वर्षांपूर्वी हे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आलेले आहे. त्यानुसार या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणूनच्या उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. केवळ कागदोपत्री काम करण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याने अपघाताची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. 

क्लिक करा ; शेतकरी महिलेने फुलविला कलकत्ता पानमळा 
ब्लॅक स्पॉटची निश्‍चिती 
रस्त्यावर 500 मीटर भागात मागील तीन वर्षांत पाच अपघात झाले, त्याचप्रमाणे पाच वर्षांत दहा व्यक्तींचे मृत्यू झाले, अशी अपघाग्रस्त ठिकाणे म्हणजे ब्लॅक स्पॉट होय. अशी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार परिवहन, बांधकाम, शहर वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संयुक्त पहाणी करून अपघातग्रस्तस्थळांची यादी निश्‍चित केली आहे. 

समिती नावालाच 
वाहनांच्या अपघाताच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघात विश्‍लेषण समित्या नियुक्त केलेल्या आहेत. या समितीने प्रत्येक अपघातस्थळी भेट देऊन आणि अपघाताच्या शक्‍यता असलेली ठिकाणे लक्षात घेऊन विश्‍लेषण करून अहवाल देणे अपेक्षित आहे. याशिवाय खासदार अध्यक्ष असलेली जिल्हा रस्ते सुरक्षा समिती कार्यरत आहे. या समितीने प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन अपघातांचा आढावा घेणे आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेणे हे काम आहे; मात्र या समितीची बैठकही नियमित होत नाही. 

काय आहेत उपाययोजना? 

 • रस्त्यातील तीव्र वळण सरळ करणे 
 • दिशादर्शक फलक लावणे 
 • कॅट आय लावणे 
 • साईड मार्किंग करणे 
 • वळण मार्किंग करणे 
 • ब्लॅक स्पॉट निश्‍चित करणे 
 • यादी रस्ते सुरक्षा समितीला देणे 
 • मंजुरीनंतर निधीसाठी शासनाकडे पाठविणे 
 • त्यानंतर त्यावर उपाययोजना करणे 

अपघाताची काही कारणे 

 • चालकाची बेफाम ड्रायव्हिंग 
 • मद्यप्राशन करून वाहने चालविणे वाहनाची बिघडलेली स्थिती 
 • ओव्हरलोड वाहने 
 • विनाफिटनेस वाहने 
 • रस्त्याची परिस्थिती 
 • धोकादायक वळणे  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Measures off, accident continues!