मोहून टाकतेय बहरलेल्या निसर्गाचे सौंदर्य... 

प्रकाश ढमाले
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) : दुष्काळात हरवलेली पर्यटनस्थळे आता गजबजली 

पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  भयानक दुष्काळानंतर यावर्षी पावसाने सुरवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने भकास दिसणाऱ्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांनी आज पुन्हा आपली ओळख निर्माण केली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा त्रिवेणी संगमात असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमध्ये नयनरम्य निसर्ग दडलेला आहे. मात्र सततच्या दुष्काळाने हे निसर्गरम्य वातावरणही भकास दिसत होते. मात्र यावर्षीचा पावसाळा या निसर्गाला वरदान ठरला आहे. निसर्गाचे मनोवेधक सौंदर्य अनेकांना मोहून टाकत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील लेणीपासूनच्या पर्वतरांगा सोयगाव, भोकरदन तालुक्‍यासह बुलडाणा जिल्ह्याकडे विस्तारित होतात. या पर्वतरांगांमध्ये सिल्लोड तालुक्‍यातील अंबऋषी, भोकरदन तालुक्‍यातील कालिकामाता, जाळीचा देव ते बुलडाणा जिल्ह्यातील अस्तित्वात येत असलेले शेगावचे उपस्थान गिरडा, भैरवनाथ अशी अनेक देवस्थाने आहेत. शिवाय भोकरदन तालुक्‍यातील मेहगावची काळी भिंत, सिल्लोड तालुक्‍यातील वडाळी गावाजवळील सीडी घाट अशी अनेक निसर्गरम्य स्थळे येथे पाहायला मिळतात. या देवस्थळी मोठी गर्दी भाविक करतात. कालिकामाता मंदिर हे डोंगरात दोन किलोमीटर खोल दरीमध्ये वसलेले आहे. येथे दर्शनासह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भाविक येतात. जाळीचा देव हे महानुभाव पंथीयांचे महत्वपूर्ण ठिकाण आहे. येथे भाविक नेहमीच पायी दिंड्यांसह येतात. येथून जवळच असलेल्या गिरडा येथे शेगावचे उपस्थान निर्माण केले जात आहे. येथील निसर्गरम्य ठिकाणही वाखाणण्याजोगे असून काळी भिंत ही प्रसिद्ध मानली जाते. तर सीडी घाट हे एक वेगळेच निसर्गरम्य ठिकाण या डोंगररांगांना लाभले आहे. नेहमी खळखळणारे पाणी, घनदाट जंगल, मनाला मोहिनी घालणारे धबधबे, पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा आवाज, घनदाट जंगलात घुमणारा पर्यटकांचा आवाज असे कितीतरी रम्य वातावरण येथे आहे. येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. 

कुठेही नाहीत सुविधा 
निसर्गरम्य वातावरण, पर्यटनस्थळ, देवी-देवतांची ठिकाणे येथे आहेत. जनसमुदायही मोठ्या प्रमाणात असतो. हिंस्र पशूंचाही येथे वावर असतो; मात्र शासनाने अद्याप येथे कुठलीही संरक्षणाची व्यवस्था केलेली नाही. निवासाची, फिरण्याची, रस्त्याची व्यवस्था येथे केली गेलेली नाही. येथे विकासाचे नावही कुठे दिसत नसल्याने भाविक, पर्यटक नाराजी व्यक्त करतात. 

येथे कसे जाणार? 
अजिंठा ते बुलडाणा या महामार्गावर ही सर्व ठिकाणे आहेत. या रस्त्यावर शिवना गावाजवळून तीन किलोमीटर अंतरावर अंबऋषीचे ठिकाण आहे. तिथून परत याच महामार्गावर आले की धावडा गावाजवळून पाच किलोमीटरवर वडाळी गावाच्या पायथ्याशी सीडी घाट आहे. परत आल्यानंतर वाढोणा गावाजवळून एक किलोमीटर अंतरावर कालिकामाता मंदिराची कमान लागते. परत आल्यानंतर पुढे तीन किलोमीटरवर जाळीचा देव हे ठिकाण आहे. तेथून पुढे बुलडाणा जिल्ह्याची हद्द सुरू होते व काही अंतरावरच गिरड्याचे रम्य ठिकाण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beauty of nature