esakal | वृद्धत्व, बायपास झालेले असतानाही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वी मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

वृद्धत्व, बायपास झालेले असतानाही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वी मात

sakal_logo
By
प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): वय ऐंशीपार, बायपास शस्त्रक्रिया झालेली. व्हेंटिलेटरवर ठेवून दहा दिवस उपचार. अशा परिस्थितीतही न डगमगता कोरोनावर मात करून येथील जोशी दांपत्याने दहशतीच्या वातावरणात इतरांना धैर्याने सामना करण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर जोशी काका-काकूंनी कोरोनावर मात केली (१४ एप्रिल) असून खचून न जाता उपचाराला प्रतिसाद द्यावा. हे दिवसही जातील असा अनमोल विश्वासही त्यांनी कोरोना रुग्णांना दिला आहे.

शहरातील वैद्यनाथ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक रमाकांतराव जोशी (वय ८४) व सेवानिवृत्त शिक्षिका विजया रमाकांत जोशी (वय ८०) यांनी ५ एप्रिलला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा त्यांना सल्‍ला दिला. वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने ते येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू असताना त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दहा दिवस त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर घरी विलगीकरणात राहून काळजी व उपचार घेतले. बघता-बघता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

बायपास सर्जरीची हिस्ट्री

शिक्षक असलेल्या रमाकांतराव जोशी व विजया जोशी या दांपत्याने कोरोनाला हरविले आहे. वय ८० च्या वर, एचआरसीटी स्कोअर ८ व ९ वाढलेला, त्यात बायपास सर्जरीची हिस्ट्री. वयोमानानुसार प्रकृतीच्या अन्य समस्या. तरीही जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर विपरीत परिस्थितीत कोरानावर मात करणारे हे ज्येष्ठ नागरिक कोरोना झाला म्हणून घाबरून जाणाऱ्यांसाठी 'आधार' ठरले आहेत. प्रचंड धैर्य, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन या ज्येष्ठांच्या जिंकण्याचे कारण ठरला.

हेही वाचा: धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

कोरोनाबाधित मुलालाही दिला धीर...

जिद्द आणि इच्छाशक्‍तीच्या जोरावरच त्यांना कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे. कोरोनाचा धसका न घेता, त्याला न घाबरता कोरोनावर मात करणे सहज शक्य असल्याचा प्रत्यय जोशी दांपत्यावरून येतो. उत्तम आहाराबरोबरच चालणे, फिरणे आणि दैनंदिन कामे करण्यास ते प्राधान्य देतात. तरुण पिढीला मार्गदर्शन करताना ते सांगतात की बाबांनो, काळजी घ्या पण खचून जाऊ नका. हे ही दिवस जातील. यासंदर्भात मुलगा अजय जोशी यांनी सांगितले की, आई बाबांना रुग्णालयात दाखल केले, परिस्थिती भयावह होती. मी स्वतः: खूप घाबरलो होतो. माझा आत्मविश्वास ढळत होता. त्यातच मलाही कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात दाखल व्हावे लागले पण त्याही विपरीत परिस्थितीत आई-बाबांनीच मला धीर दिला. १० एप्रिल रोजी मा कोरोनातून सुखरूप बाहेर पडलो.

loading image