Beed Antyodaya Sugar Shortage : उत्सवात हिरावला गरिबांच्या तोंडचा गोडवा; जिल्ह्यातील ३८ हजार अंत्योदय कार्डधारकांना ३ महिन्यांपासून साखर नाही

Sugar Supply Reportedly Pending for Three Months : बीड जिल्ह्यातील ३८ हजार अंत्योदय कार्डधारकांना जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपासून रेशनची साखर मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
Beed Antyodaya Sugar Shortage

Beed Antyodaya Sugar Shortage

esakal

Updated on

बीड : गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनाने सध्या भक्तिमय आणि उत्साही वातावरण आहे. घरोघरी गोडाधोडाचे पक्वान्न बनवण्याची लगबग सुरू असून, बाप्पाला मोदकांचा तर गौराईला फराळाचा नैवेद्य दाखवण्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. मात्र, याच उत्सवाच्या झगमगाटात बीड जिल्ह्यातील एक विदारक आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शासनाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रेशनच्या हक्काच्या साखरेपासून जिल्ह्यातील तब्बल ३८ हजार अंत्योदय कार्डधारक गेल्या तीन महिन्यांपासून वंचित आहेत. महागाईच्या या भडक्यात, सणासुदीच्या दिवशी गरिबांचे तोंड गोड व्हावे यासाठी शासनाने आखलेली योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिली असून, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अजब कारभारामुळे अंत्योदय लाभार्थींना यंदाचा सण कडू घासानेच साजरा करावा लागत आहे.

शासकीय नियमानुसार अंत्योदय अन्न योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा सवलतीच्या दरात साखर वाटप करणे बंधनकारक आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील राशन दुकानांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपासून साखरेचा एक दाणाही पोहोचलेला नाही. नियमित धान्य मिळत असले तरी साखरेचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. जेव्हा कार्डधारक हक्काची साखर मागण्यासाठी राशन दुकानावर जातात, तेव्हा ‘वरूनच साखरेचा कोटा आला नाही’ असे मोघम उत्तर देऊन त्यांना हात हलवत परत पाठवले जात आहे.

Beed Antyodaya Sugar Shortage
Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

गणेशोत्सव आणि ज्येष्ठा गौरीचे आगमन हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि जिव्हाळ्याचे सण मानले जातात. या सणांच्या दिवसांत नैवेद्यासाठी आणि पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी साखरेची मोठी गरज असते. सध्या खुल्या बाजारात साखरेचे दर ६० ते ६५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. अशा वेळी बाजारातून महागडी साखर विकत घेणे या गरीब कुटुंबांच्या खिशाला परवडणारे नाही.

हक्काच्या राशनच्या साखरेवर अवलंबून असलेल्या ३८ हजार कुटुंबांसमोर आता सणाचा गोडवा कसा निर्माण करायचा, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच साखरेचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या या अक्षम्य हेळसांडीमुळे बीड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांच्या आनंदावर मोठे विरजण पडले आहे.

रेशन दुकानांवर दररोज उडतात खटके

साखर मिळत नसल्याने राशन दुकानांवर दररोज नागरिक आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडत आहेत. शासनाकडून कोटा मंजूर झाला आहे, मग आमची साखर जाते कुठे? असा थेट सवाल लाभार्थी विचारत आहेत. तर दुसरीकडे, गोदाम आणि पुरवठा विभागाकडूनच साखरेचा पुरवठा झाला नसल्याने आम्ही तरी कुठून साखर देणार, असा उद्विग्न सवाल दुकानदार व्यक्त करत आहेत. पुरवठा विभागाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

Beed Antyodaya Sugar Shortage
Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

प्रशासनाकडून कारवाईचा इशारा

अनेक राशन दुकानदारांकडे अंत्योदय कार्डधारकांची संख्या कमी असते. त्यामुळे त्यांना दरमहा वेगवेगळे चलन भरताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून दर तीन महिन्यांचे चलन एकदाच भरून घेऊन साखरेचा कोटा वितरित केला जातो. परंतु, दुकानदारांनी ही साखर प्रत्येक महिन्याला कार्डधारकांना नियमित वाटप करणे बंधनकारक आहे.

कडक प्रशासकीय कारवाई करणार

पुरवठा विभागाचे प्रशांत सुपेकर यांनी स्पष्ट केले की, गेल्या महिन्यापर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र राशन दुकानदारांना साखरेचा कोटा पूर्णपणे पोहोच करण्यात आलेला आहे. तरीही जर काही दुकानदार साखरेचे वाटप करत नसतील किंवा कार्डधारकांना साखरेपासून वंचित ठेवत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा दुकानदारांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल.

"गणपती आणि गौराईचा सण वर्षातून एकदाच येतो. सणाला गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा तर बाजारात साखर ६५ रुपये किलोने घ्यावी लागतेय. तीन महिने झाले राशन दुकानातून साखर गायब आहे. सरकारने सणाच्या काळात तरी गरिबांची हक्काची साखर द्यायला हवी होती."

- द्वारकाबाई कांबळे,

(अंत्योदय कार्डधारक, बीड)

"दर महिन्यात धान्यासोबत साखर मिळेल या आशेने राशन दुकानावर जातो, पण दुकानदार ''मागूनच साखरेचा कोटा आला नाही'' म्हणून हात वर करतात. जर सणासुदीच्या दिवसांतच आम्हाला साखर मिळणार नसेल, तर या सरकारी योजनांचा उपयोग काय?"

- रामेश्वर गिरवे,

(कार्डधारक)

"शासनाकडून कागदावर योजना जाहीर होतात, पण प्रत्यक्ष राशन दुकानापर्यंत माल पोहोचतच नाही. गेल्या तीन महिन्यांपासून आमची हक्काची साखर कुणाच्या घशात गेली? या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला आमचा साखरेचा कोटा त्वरित मिळाला पाहिजे."

- जनाबाई पवार,

(कार्डधारक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com