esakal | बीड : बिंदुसरा धरण तुडुंब भरले; पर्यटकांची गर्दीही वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

बिंदुसरा धरण

बीड : बिंदुसरा धरण तुडुंब भरले; पर्यटकांची गर्दीही वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : आठवडाभरात दोन वेळा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि विशेषतः शनिवार - रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्पांसह साठवण तलाव तुडूंब भरले आहेत. माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला असून बिंदूसरा धरणही तुडूंब भरले आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन; पाहा व्हिडिओ

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील २० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती. तर, शनिवार - रविवारच्या मध्यरात्री ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने मोठ्या प्रमुख नद्यांसह गावांतील नद्या, ओढेही वाहू लागले. सोमवार व मंगळवारीही जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरुच होते. दरम्यान, या दमदार पावसामुळे गोदावरी नदीलाही पुर आला तर पैठण नाथसागराच्या उजव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. परिणामी माजलगाव धरणात पाणीसाठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. मांजरा धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. बीड परिसरातील पालीचे बिंदूसरा धरणही तुडूंब भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प व ४२ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले असून या प्रकल्पांतून पाणी सोडल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात पावसाचा कहर! मांजरा नदीला पूर, पाण्याची आवकही वाढली

तर, साठवण तलावांतही शंभर टक्के पाणी साठल्याचा अहवालही गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे. दरम्यान, प्रकल्पांतील पाणीसाठ्यात आठवडाभरातच ६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहा दिवसांपूर्वी प्रकल्पांत केवळ ३४ टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, पावसामुळे प्रकल्प व साठवण तलाव तुडूंब भरल्याने रब्बी हंगामासह उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, अतिवृष्टीने खरीप हंगामाचे संपूर्ण नुकसान केले आहे.

loading image
go to top