esakal | ‘ब्रेक द चेन’मुळे कापड व्यवसाय संकटात, निर्बंधांमुळे लग्नसराईतील चैन संपली
sakal

बोलून बातमी शोधा

Garment Business

सरकारने ‘ब्रेक द चेन’मधून व्यवसाय बंद केले आहेत. असे असले तरी दुसरीकडे ई- कॉमर्सच्या नावाखाली ऑनलाइन खरेदी सुरू ठेवली आहे.

‘ब्रेक द चेन’मुळे कापड व्यवसाय संकटात, निर्बंधांमुळे लग्नसराईतील चैन संपली

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : अन्य व्यवसायाच्या तुलनेत कोरोना प्रसाराच्या काळात कापड व्यवसायाकडे पाहण्याची सर्वांचीच नजर वेगळी आहे. यातूनच गेल्या वर्षीही ऐन लग्नसराईतच लॉकडाऊन लागला. यंदाही लग्नसराई सुरू होताच ‘ब्रेक द चेन’मधून व्यवसायावर अचानक निर्बंध आले आहेत. यात कापड व्यापारी आर्थिक संकटात सापडले असून, लहान व्यापारी तर मानसिकदृष्ट्या खचले आहेत. बंधने घातल्याने आता लग्नसराईतील चैन संपली असून, सर्वच प्रकारचा कापड व्यवसाय घळाटला आहे. 

"आम्ही यापुढे लॉकडाउनचे अनुसरण करणार नाही ! बस म्हणजे बस !!' 


शहरात स्वतंत्र कापड लाईन असून, या भागात विविध प्रकारची कापड व रेडिमेड कपड्यांचे दुकाने आहेत. या व्यवसायावर मोठ्या संख्येने कामगारांची उपजीविका अवलंबून आहे. कापड व रेडीमेड कपड्यांच्या व्यवसायाला एप्रिल व मे महिन्यामध्ये ‘अच्छे दिन’ असतात. या दोन महिन्यात व्यवसायाचा हंगाम (सिजन) असतो, वर्षभरातील साठ टक्के व्यवसाय या काळात होतो. गुढीपाडवा आणि लग्नसराईमुळे कपड्यांची मोठी खरेदी होते. त्यानंतर दिवाळीत नागरिक कपडे खरेदी करतात. गेल्यावर्षी लग्नसराई सुरू होताच लॉकडाऊन लागला. मध्यंतरी लॉकडाऊन उठल्यानंतर हंगाम नसलेल्या काळात दुकाने सुरू राहिली.

Corona Updates: मराठवाड्यात कोरोनाचे सहा हजार ६५६ रुग्णांची भर, सात जिल्ह्यांत ८३ जणांचा मृत्यू 

यंदा तर कोरोनाचे रूग्ण वाढताच एक मार्चपासूनच व्यवसाय कमी झाला. रूग्ण वाढताच प्रशासनाने लग्न व अन्य कार्यक्रमांसाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घातली. यामुळे कमी खर्चात लग्न व कार्यक्रम सुरू झाले. एकमेकांना कपडे घेऊन आहेर करण्याची पद्धतच बंद झाली. यातच गुढीपाडवा व लग्नसराईच्या निमित्ताने दोन पैसे कमावण्याची संधी आली असतानाच ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली व्यवसाय बंद करण्यात आले. सरकारने अचानक हा निर्णय लादल्याने व्यापाऱ्यांना धक्का बसला. आता दुकानातील कामगारांना बसून वेतन देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. 

'आता कुठवर लॉकडाउन, माझं लगीन गेलय राहून...'


ऑनलाइन खरेदीला परवानगी 
सरकारने ‘ब्रेक द चेन’मधून व्यवसाय बंद केले आहेत. असे असले तरी दुसरीकडे ई- कॉमर्सच्या नावाखाली ऑनलाइन खरेदी सुरू ठेवली आहे. सरकारच्या या दुजाभावामुळे व्यापारी संतप्त झाले असून, त्यांनी आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दुकानांत काम करणाऱ्या मोठ्या संख्येने कामगारही अडचणीत आले आहेत. ‘ब्रेक द चेन’च्या काळातील पगार मिळण्याची त्यांना आशा आहे. यंदाही व्यवसाय बंद राहिल्यास दुसरीकडे काम शोधण्याची वेळ येणार असल्याचे एका कामगाराने (मुनिम) नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

लातूरमध्ये कापड व रेडिमेड कपड्याचे दोन ते अडीच हजार दुकाने आहेत. यात घरगुती साड्या विक्रीचाही व्यवसाय अनेक करतात. गेल्यावर्षीचा लॉकडाऊन व यंदाचा ‘ब्रेक द चेन’ ऐन व्यवसायाच्या हंगामात आल्याने व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह बंद पडला आहे. दुर्दैवाने सरकार व राजकीय व्यक्तींची या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. त्यामुळे कापड व्यापाऱ्याला कोणीच वाली उरला नसल्याने तो नेहमी उपेक्षितच आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाचे वर्षही असेच गेले तर आर्थिक अचडणी व अन्य समस्यांना व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागेल. 
- प्रदीप सोलंकी, अध्यक्ष, लातूर व्यापारी महासंघ. 

संपादन - गणेश पिटेकर

loading image