esakal | लग्नाळू तरुणांनो सावधान! उतावळेपणामुळे होऊ शकतो घात, पोलिसांची बीड जिल्ह्यात मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Crime News Ashti

सदरील दोन्ही आरोपींना पाटोदा येथील न्यायालयात रविवारी (ता.१४) हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लग्नाळू तरुणांनो सावधान! उतावळेपणामुळे होऊ शकतो घात, पोलिसांची बीड जिल्ह्यात मोठी कारवाई

sakal_logo
By
निसार शेख

कडा (जि. बीड) : महाराष्ट्रातील लातूर, पंढरपूर, सांगली, नांदेड, केज, इंदापूर व कवठेमहांकाळ या शहरातील विवाह इच्छुक व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन जणांना आष्टी पोलिसांनी शनिवारी (ता.१३) सायंकाळी अटक केली. या घटनेने आष्टीसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका २७ वर्षीय तरुणासोबत लातूर येथील सोनाली गणेश काळे (वय २९) यांचा मंगळवारी (ता.नऊ) आष्टी येथील गणपती मंदिरात विवाह संपन्न झाला. परंतु लग्नाच्या दिवशी रात्री सदरील महिलेने आपल्या पतीला २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून माझ्यावर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्यानंतर पतीच्या पायाखालील जमीन सरकली.


सदरील तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने आष्टी पोलिसांना ही माहिती दिली. आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सापळा रचून खंडणी वसूल करणाऱ्या अजय महारुद्र चवळे (वय २७, रा.खंडापूर, जि.लातूर) व सोनाली गणेश काळे (वय २९, रा.लक्ष्मी कॉलनी, लातूर) यांना पन्नास हजाराची खंडणी घेताना आष्टी येथे शनिवारी (ता.१३) रंगेहाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला. प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले.


आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका युवकाने पोलिस ठाण्यात सदरील महिलेविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्या बाबतची तक्रार दिल्याने पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सदर तक्रारीची शहानिशा करुन तक्रारदाराने सांगितल्या प्रमाणे खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचासह सापळा रचून कारवाई केली असता एक महिला व पुरुष यांनी तक्रारदार युवकाकडुन मागणी केल्याप्रमाणे रोख रक्कम ५० हजार रुपये शासकीय पंचासमक्ष स्वीकारली. सदर आरोपींकडे चौकशी केली असता या टोळीने आतापर्यंत अनेक जणांना फसवले असल्याचे सांगितले.

सदरील दोन्ही आरोपींना पाटोदा येथील न्यायालयात रविवारी (ता.१४) हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील तिसरा आरोपी रामा काशीनाथ बडे (रा खर्डा ता.जामखेड) याला रविवारी (ता.१४) दुपारी दीड वाजता आष्टी पोलिसांनी अटक केली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक आर.राजा, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, सहायक फौजदार अरुण कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पोलिस शिपाई प्रदीप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, रियाज पठाण यांनी केली.


वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून ही टोळी आमच्याकडे मुलगी आहे असे सांगून स्थळ दाखवते व लग्नासाठी पैशाची मागणी करुन वारंवार खंडणी वसूल केली जाते. या टोळीपासून तरुणांनी सावध रहावे व अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.
- सलीम चाऊस, पोलिस निरीक्षक, आष्टी

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top