सेटलमेंट फिस्कटल्यामुळे अप्रमाणित औषधांचा भांडाफोड! अन्न व औषधी विभाग गप्प का?

Kalamb Crime News
Kalamb Crime News

कळंब (जि.उस्मानाबाद) : येथे नऊ डॉक्टरांनी मिळून धन्वंतरी रुग्णालयातील वरच्या मजल्यावर स्थापन केलेल्या 'डिकेडी फार्मा' या औषध गोळ्यांच्या कंपनीत पावणे दोन लाखांची अप्रमाणित औषधे अन्न व औषधी विभागाने मारलेल्या धाडीत सापडले. या घटनेला पाच दिवस झाले असले तरी त्या मागील उलगडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. सप्टेंबर २०२० मध्ये अप्रमाणित औषधे असल्याची माहिती उघड होऊन ही अन्न व औषध विभाग गप्प का होता? 'अर्थाची सटेलमेंट' फिस्कटल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड अधिकाऱ्यानी तर केला नाही ना अशी संशयाची सुई अन्न व औषधी विभागाच्या भोवती फिरत असल्याची चर्चा शहरात असून आहे.

आपल्याच दवाखान्यातील व परिसरातील औषधी दुकानात स्वतःच्या कंपनीने बनविलेली औषधे रुग्णांना विक्री करून रुग्णाची लूट करण्याचा गोरख धंदा वर्ष २०१७ मध्ये शहर व परिसरातील नऊ डॉक्टरानी मिळून सुरू केला होता. औषध गोळ्या हिमाचल प्रदेश येथील 'लाईफ व्हिजन हेल्थ केअर' कंपनीकडून बनवून घेऊन ती विक्री करण्याचा नऊ डॉक्टराच्या डिकेडी फार्मा कंपनीने परवाना अन्न व औषध विभागाच्या सहमतीने घेण्यात आला. ही बाब औषधी प्रशासनाला माहीत असतानाही हेतुपुरस्सर त्यावेळी औषधांचे नमुने घेण्यास टाळाटाळ केली असल्याचा प्रकारसमोर येत आहे.

पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना जून २०२० मध्ये अचानक औषध गोळ्यांचे नमुने घेणे ते औषध प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविणे, सप्टेंबर २०२० मध्ये तपासणी अहवाल आल्यानंतर शहरातील संबधित धन्वंतरी रुग्णालयाच्या वरच्या मजल्यार सुरू असलेली डिकेडी फार्मा ही कंपनी विक्री करत असलेली औषधे गोळ्या पाच महिन्यानंतरही अन्न व औषध विभागाला का दिसली नाही, असे अनेक शंका उपस्थित होत आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात डिकेडी फार्मा कंपनीच्या नऊ डॉक्टरानी अप्रमाणित औषधे गोळ्या देऊन लुटण्याचा धक्कादायक प्रकार केला.

संबंधित विभागातील अधिकाऱ्याच्या हप्ते खोरीच्या सवयीमुळे या कंपनीला लुटण्याचा परवाना दिला असल्याची बाब उघड होत आहे. त्यामुळे अर्थ दिला तर सावजी, नाही दिला तर चोर अशी अवस्था या प्रकरणाची झाली असल्याची शहरात चर्चा आहे. अप्रमाणित औषधे कधी पासून ही कंपनी विक्री करीत होती. दर महिन्याला औषध गोळ्या प्रमाणित आहेत की नाही याची संबधित अन्न व औषध प्रशासनाने चौकशी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून अप्रमाणित औषधांची खोलपर्यत चौकशी वरिष्ठस्तरावरून झाल्यास दुधात किती पाणी आहे हे कळणार आहे.

लाईफ व्हिजन हेल्थ केअर कंपनीचा परवाना निलंबित
झटपट पैसे कमविण्यासाठी शहर व परिसरातील नऊ डॉक्टरानी एकत्रित येऊन डिकेडी फार्मा या औषध गोळ्याच्या कंपनीला जन्मास घातले. ही कंपनी हिमाचल प्रदेश येथील लाईफ व्हिजन हेल्थ केअर कंपनीकडून पेरासिटामाॅल पेन किलर, टेब्लेट आदी तीन प्रकारची गोळ्या औषधे बनवून घेऊन शहर व परिसरातील नऊ डॉक्टर यांच्या दवाखान्यातील मेडिकलद्वारे विक्री करायचे. अप्रमाणित औषधे बनवून दिल्याप्रकरणी हिमाचल सरकारने लाईफ व्हिजन हेल्थ केअर कंपनीचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com