बीड बायपासवर वांझोटी चर्चा

Beed-Bypass
Beed-Bypass

औरंगाबाद - बीड बायपासवरील अपघाताची मालिका रोखण्यासाठी सोमवारी (ता. दहा) घेण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत केवळ वाझोंटी चर्चा झाली. एकमेकांकडे बोट दाखवत असे करता येईल, तसे करता येईल म्हणत निर्णयाविनाच बैठक संपली. 

बीड बायपासवरील वाहतूक, अपघातांचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक झाली. खासदार खैरे म्हणाले, की या रस्त्यालगत दोनशे मीटरच्या आत कसे बांधकाम झाले, अनेकजण दुकाने समोर आणत आहेत. शिवाय, अतिक्रमणेही काढायला हवीत, अशा सूचना त्यांनी केल्या. 

प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. वाहतुकीच्या वेगाबद्दल तुम्ही काय केले, मोटारसायकलवरून तिघांना फिरण्याची परवानगी दिली का, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. त्यावर आम्ही इतक्‍या कारवाया केल्या, असे उत्तर सदामते यांनी दिले. 
जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शॉर्टटर्म, लाँगटर्म असे गुळगुळीत शब्द वापरत काही बैठका घेतल्या आहेत, काहीतरी पर्याय काढू, अशी उत्तरे दिली.

अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण म्हणाले, की लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केल्यास या रस्त्याला नॅशनलचा दर्जा मिळू शकेल. सर्व्हिस रोडची महापालिकेने जबाबदारी स्वीकारावी. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी अन्य कामांतून शिल्लक राहिलेले पैसे या कामासाठी वापरावेत, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त एस. एच. भापकर यांनाही वाहतुकीच्या समस्येबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी केवळ आम्ही इतक्‍या कारवाया केल्या, असे उत्तर दिले. बैठकीस महापालिकेचे आयुक्त निपुण विनायक, नॅशनल हायवेचे गाडेकर आदी उपस्थित होते.

‘बायपास सातपदरी करू’
या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोठमोठ्या कॉम्प्लेक्‍सच्या समोर मुरूम टाकून पर्किंगची सोय केली. यामुळे रस्त्यालगत हा मुरूम असल्याने वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत. चारपदरी असलेल्या या रस्त्याला देवळाई चौक ते महानुभाव आश्रमापर्यंत सातपदरी करता येईल. लवकरच या कामाला सुरवात करू, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

देवळाई चौक, केंब्रिज अन्‌ सिडकोत उड्डाणपूल
आशियाई बॅंक प्रकल्पाच्या माध्यमातून देवळाई, केंब्रिज आणि सिडको बसस्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे पूल झाल्यास शहरातील व बायपास, जालनारोड येथील वाहतुकीची कोंडी दूर होण्यास मदत होईल. त्यामुळेच हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे या बैठकीत चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com