‘ब्लॅक स्पॉट’चा झाला ‘मृत्युपथ’!

औरंगाबाद - बीड बायपासवर लेन शिस्त मोडून सिग्नल लागलेला असताना जड वाहनांना वळसा घालून जाणारी चारचाकी.
औरंगाबाद - बीड बायपासवर लेन शिस्त मोडून सिग्नल लागलेला असताना जड वाहनांना वळसा घालून जाणारी चारचाकी.

औरंगाबाद - एखाद्या ठिकाणी तीन वेळा अपघात झाला तर त्याला पोलिस ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणतात; परंतु बेशिस्त वाहने अन्‌ ‘ओव्हरफ्लो’ झालेल्या वाहन क्षमतेने अशा स्पॉटचे जाळे असलेला बीड बायपास आता ‘अपघातपथ’च बनला आहे. जालना, बीडकडून येणाऱ्या जड वाहनांना शहरातून बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक असा विस्तारित रस्ता म्हणून बीड बायपास उभा राहिला खरा; पण रहिवासी क्षेत्राच्या घेऱ्यात सापडलेल्या या रस्त्याची ओळख आज जड वाहने वाहून नेण्यापेक्षा अपघाताचा निमंत्रक म्हणूनच अधिक झाली आहे. सुरवातीला देवळाई चौक, एमआयटी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता हे अपघात क्षेत्र होते; पण आता पूर्ण रस्ताच अपघात क्षेत्र बनला आहे.

सिग्नल व्यवस्था हवी सक्षम
बीड बायपासवर मालवाहू जड वाहनांसोबतच दुचाकी, कारची संख्या मोठी आहे. लहान वाहने लेनची शिस्त पाळण्यास कुचराई करतात आणि त्याचे अनेकदा अपघातात परिवर्तन होते. सात मीटरचा एका बाजूचा कॅरेज वे असलेला बीड बायपास रस्ता सिग्नलच्या माध्यमातून अधिक सुरक्षित होऊ शकतो. मर्यादित (३०० ते ४०० मीटर) अंतरावर असलेले सिग्नल वाहनांचा वेग आवरतात; मात्र असे सिग्नल बीड बायपासवर उपलब्ध नाहीत. 

वेग मर्यादेला हवा अटकाव
अपघात टाळण्यासाठी ४० किमी प्रतितास वेग हवा; मात्र या रस्त्यावर कुठलेही वाहन यापेक्षा जास्त वेगानेच जाते. स्पीड गन लावून वाहनचालकांवर लक्ष ठेवणारे पोलिसही हातावर हात देऊन बसतात. लेन मॅनेजमेंट आणि वेग मर्यादा जड वाहने पाळत असली तरी छोटी वाहने सुसाट असतात.

शिवाजीनगर, देवळाईचे बॉटलनेक
शिवाजीनगर येथे असलेल्या रेल्वे क्रॉसिंगचे अंतर मुख्य रस्त्यापासून शंभर ते दीडशे मीटर आहे; मात्र त्यावरील वाहन संख्या मोठी असते. याचा परिणाम बीड बायपासच्या दळणवळणावर होतो. वाहनांची संख्या भरमसाट असल्याने क्रॉसिंग लागल्यावर येथील वाहनांची रीघ ही बीड बायपासपर्यंत येऊन टेकते. त्याचा परिणाम म्हणून अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. 

जालना रस्त्यावरील अपघात
जालना रस्त्यावर बीड बायपासच्या तुलनेने जड वाहनांची संख्या कमी आहे. सिग्नलचे अंतर कमी असल्याने जालना रस्त्यावरील अपघातांची संख्या घटली आहे. जे अपघात होतात त्यांची तीव्रताही बीड बायपासच्या तुलनेने कमीच आहे. या रस्त्यावरील पुलांवर लेनची शिस्त पाळल्यास अपघातांची संख्या घटण्यात मदत होणार असल्याची अपेक्षा पोलिसांची आहे.

पोलिसांच्या या आहेत अपेक्षा...
 ओव्हरटेकिंगच्या भानगडीत न पडता लेनची शिस्त पाळावी
 दुचाकीस्वारांनी वेगमर्यादा पाळत मोठ्या वाहनांना क्रॉस करणे टाळावे.
 झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच वाहने उभी करा, पादचाऱ्यांना प्राधान्य द्या. 
 शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगला पर्याय निघावा, सर्व्हिस रस्ताही व्हावा.  
 सिग्नल ऑरेंज असताना वाहनांचा वेग न वाढवता वाहने थांबवावीत. 
 लोकांनी राँगसाईडने वाहने चालविणे कटाक्षाने टाळावे. 
 ‘एनएचएआय’तर्फे नव्या बासपायसचे काम वेळेत व्हावे. 

बीड बायपासला एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी पूर्णवेळ तैनात आहेत. वाहनांनी लेन आणि वेगाच्या मर्यादा सांभाळल्यानंतर अपघातांना आळा बसेल. जालना रस्त्यावरील सिग्नल, दुभाजकांची संख्या यात फरक असल्याने अपघातांचे स्वरूपही वेगळे आहे. शिवाजीनगरला जमणारी वाहने बायपासच्या दळणवळणात खोडा घालतात. 
- भरत काकडे, पोलिस निरीक्षक, महामार्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com