आष्टीत जप्त केलेल्या बोट घेऊन वाळूमाफियांचा पोबारा! 

अनिरुद्ध धर्माधिकारी 
Friday, 20 November 2020

पाच तासांच्या पाठलागानंतर पथकाने पुन्हा घेतली ताब्यात

आष्टी (बीड) : अवैध वाळू उपसा करणारी बोट महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. मात्र, सायंकाळच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेत वाळूमाफियांनी चक्क जप्त केलेली बोट घेऊन पोबारा काढला. सीना नदीच्या पात्रात तालुक्यातील वाकी शिवारात गुरुवारी (ता.19) ही घटना घडली. तब्बल पाच तासांच्या पाठलागानंतर पुन्हा ही बोट ताब्यात घेण्यात पथकाला यश आले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नव्यानेच तहसीलदारपदाचा पदभार घेतलेले राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. तालूक्यातील घोंगडेवाडी येथे आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर अवैध वाळू उपशाचे आगर असलेल्या वाकी शिवारात सीना नदीपात्रात सुरू असलेल्या बेसुमार वाळूउपशाच्या तक्रारी तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या पथकासह वाकी येथे गुरुवारी (ता. 19) कारवाई केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वाकी येथे सीना नदीच्या पात्रातून बोटीच्या सहाय्याने वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच नायब तहसीलदार नीलिमा थेऊरकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, मंडळाधिकारी इंद्रकांत शेंदूरकर, मंडळाधिकारी पांडुरंग माढेकर, तलाठी प्रवीण बोरूडे, नवनाथ औंदकर, जगदीश राऊत, कोतवाल फिरोज शेख, संतोष भुकन यांच्या पथकाने वाळू उपसा करणारी बोट ताब्यात घेतली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सायंकाळी जप्त करण्यात आलेल्या बोटीचा पंचनामा सुरू असताना अंधार पडल्याचा गैरफायदा उचलत वाळूमाफियांनी चक्क बोटीसह पोबारा केला. मात्र, महसूल व पोलिसांच्या पथकाने तब्बल पाच तास या बोटीचा शोध घेवून ती पुन्हा ताब्यात घेतली. दरम्यान बोट पळविणारे वाळू माफिया मात्र तेथून फरारी होण्यात यशस्वी झाले. 

अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा 
दरम्यान, जप्त केलेल्या बोटीचा जाय मोक्यावर अंधार पडल्याने थोड्या अंतरावर असलेल्या प्रकाशात पंचनामा सुरू असताना अंधाराचा फायदा घेत दोन-तीन व्यक्तींनी बांधलेली बोट सोडून ती पळविण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तींना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दमदाटी करून बोट घेऊन गेले. दीड किलोमीटर अंतरावर तिखी (ता. कर्जत, जि. नगर) हद्दीतून पथकाने ती पुन्हा ताब्यात घेतली. याबाबत मंडळाधिकारी इंद्रकांत शेंदूरकर यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boat confiscated revenue administration was hijacked sandmafia