बीड कोरोना : १८ अहवाल निगेटीव्ह; दोघांना डिस्चार्ज 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

  • निगेटीव्ह अहवाल आढळलेल्यांना गावातून काढले 
  • सर्वाधिक १८ रुग्ण आढळले बीड शहर व तालुक्यात 
  • साडेपंधरा हजार लोक होम क्वारंटाईन 
  • आतापर्यंत १५६४ स्वॅबची तपासणी 

बीड - कोरोना रुग्णसंख्येने पाऊण शतक (७६) पूर्ण केले असले तरी मंगळवारी (ता. नऊ) दोघांसह उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जिल्ह्यात ६१ झाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी तपासणीसाठी पाठविलेल्या सर्व १८ स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. एकीकडे दिलासा मिळाला असला तरी कोरोनाग्रस्त कुटुंबातील निगेटीव्ह अहवाल आलेल्या एका महिलेसह दोन मुलांना गावात घेतले नसल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव खुर्द (ता. गेवराई) येथे घडला. अखेर हे मायलेकरे शहरातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल झाले. 

जिल्ह्यात आतापर्यंत ७६ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यापैकी ६१ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले आहे. तर, एका वृद्धेसह एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात सात, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात चार, तर गेवराई उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये एक व एका वृद्धेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मंगळवारी जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व केज उपजिल्हा रुग्णालयांतून अंबाजोगाईच्या स्वारातीमधील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत पाठविलेल्या सर्वच १८ थ्रोट स्वॅबचे अहवाल निगेटीव्ह आले. याच दिवशी दोन रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर डिस्चार्जही देण्यात आला. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

कुटुंबाला गावात घेतले नाही 
तीन जूनला गेवराई तालुक्यातील मालेगाव (खुर्द) येथील एक कुटुंब ठाण्याहून गावाकडे येत होते. वाटेतच यातील व्यक्तीची नगरमध्ये तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या मुलीला बीडमध्ये आल्यानंतर कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबातील महिला व इतर दोन मुलांचे स्वॅब तपासल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने हे तिघे शासकीय रुग्णवाहिकेने मंगळवारी गावाकडे गेले. परंतु, त्यांना गावात घेतले नाही. त्यामुळे ते परत येथे येऊन संस्थात्मक अलगीकरण कक्षात थांबले आहेत. 

 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

आतापर्यंत १५७१ स्वॅबची तपासणी 
जिल्ह्यात आतापर्यंत ७६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकाची तपासणी नगरला तर एकाची औरंगाबादला झाली आहे. आतापर्यंत एकूण १५७१ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. सर्वाधिक स्वॅब बीडच्या कोविड रुग्णालयातून ८६४, तर कोविड केअर सेंटरमधून ११ पाठविले आहेत. अंबाजोगाईच्या कोविड रुग्णालयातून १६६, तर कोविड केअर सेंटरमधून ३२ स्वॅब तपासले आहेत. केजच्या उपजिल्हा रुग्णालयातून १०१, माजगाव ग्रामीण रुग्णालयातून १४१, तर आष्टी उपजिल्हा रुग्णालयातून ८३ व गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून ८५ आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून ८२ स्वॅबची तपासणी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona: 18 reports negative; Discharge both