Corona Breaking : बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधीत महिलेचा औरंगाबादेत मृत्यू

रामदास साबळे
Tuesday, 16 June 2020

  •  जिल्ह्यातला तिसरा मृत्यू
  •  रुग्णसंख्या ९२; कोरोनामुक्त ६४
  •  केजच्या खासगी दवाखान्यातही घेतले उपचार

केज (बीड): तालुक्यातील माळेगाव येथील साठ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मंगळवारी (ता.१६) सकाळी मृत्यू झाला. मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशीच या महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. दरम्यान, बीड जिल्ह्यात आता कोरोनाबळींची संख्या तिन झाली असून यातील एक महिला नगर जिल्ह्यातील आहे. 

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

या महिलेसह बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६४ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यापूर्वी दोघांचा बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यातील एक महिला नगर जिल्ह्यातील होती. माळेगाव (ता. केज) येथील साठ वर्षीय महिलेवर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया करुन (ता.तीन) जूनला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, घरी आल्यानंतर त्या महिलेला परत त्रास होऊ लागल्याने तिच्यावर केज शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. 

 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

तरीही त्रास कमी न झाल्याने तिचा दहा जून रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  याच दरम्यान पंधरा जून रोजी या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. दरम्यान, या महिलेसह आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९२ झाला. यातील ६४ कोरोनामुक्त तर तिन मृत्यू झाले. २५ जणांवर बीड जिल्ह्यासह मुंबई, पुणे व औरंगाबादेत उपचार सुरु आहेत. 

 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

तिसरा बळी; जिल्ह्यातील दुसरा

दरम्यान, नगर जिल्ह्यातील एक कुटूंब मुंबईहून नातेवाईकांकडे आष्टी तालुक्यात आले. या कुटूंबातील सात व्यक्तींना कोरोनाची बाधा आढळली. त्यातील एका महिलेचा ता. १७ मे रोजी मृत्यू झाला होता. तर, मातकुळी (ता. आष्टी) येथील तुरुणाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. तत्पुर्वी घेतलेल्या त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. आता आरैंगाबादला झालेला महिलेचा मृत्यू हा जिल्ह्याच्या यादीतील तिसरा आणि जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबळी आहे. 

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

दवाखाना सील; स्वॅब घेणार

केज शहरातील मृत्यू झालेल्या महिलेने उपचार घेतलेल्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टरसह इतर दहा जणांचे व महिलेच्या कुटूंबातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. हा खाजगी दवाखाना सील करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona positive lady death in aurangabad