esakal | चिंताजनक! बीडमध्ये तपासण्या घटूनही कोरोना रुग्ण पावणेदोनशे पार
sakal

बोलून बातमी शोधा

beed

चिंताजनक! बीडमध्ये तपासण्या घटूनही कोरोना रुग्ण पावणेदोनशे पार

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याचे सांगितले जात असले तरी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग काही कमी झालेला नाही. बुधवारच्या (ता. १४) तुलनेत तपासणींची संख्या हजाराने कमी करूनही कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा पावणे दोनशेपार (१८१) पोचला. कहर म्हणजे नवीन व जुन्या चार कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली. तपासण्यांच्या तुलनेत पुन्हा पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाली. गुरुवारी (ता.१५) ४ हजार १८७ लोकांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल तपासणीसाठी घेतले. तपासण्यांचे अहवाल शुक्रवारी (ता. १६) हाती आल्यानंतर यामध्ये १८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तपासण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट (रुग्ण आढळण्याचे प्रमाण) ४.३२ टक्के होता. हेच प्रमाण गुरुवारी ३.२५ टक्के होते. बुधवारी रुग्णसंख्या १९६ असली तरी पॉझिटिव्हिटी रेट ३.७४ होता. या दिवशी तब्बल ५२३७ लोकांचे स्वॅब नुमने तपासले होते. दरम्यान, मागच्या महिनाभरापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख दीडशे ते दोनशेंच्या घरात कायम आहे. मात्र, तपासण्यांची संख्या मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेने अधिक आहे.

दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ९४ हजार ४५७ झाली आहे. तर, शुक्रवारच्या ११० कोरोनामुक्त रुग्णांसह आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९० हजार १२९ झाली आहे. शुक्रवारी मागील २४ तासांत दोन कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली. तर, जुने दोन मृत्यू शुक्रवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर अपडेट झाले. आतापर्यंत जिल्ह्यात २५७० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली.

हेही वाचा: रिमझिम पावसात अनुभवावे 'माथेरान'

सक्रिय रुग्णसंख्याही वाढली-
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना नवीन आढळणारे रुग्ण कमी आणि कोरेानामुक्त अधिक असे प्रमाण होते. त्यामुळे जिल्ह्यात एकेकाळी एकाच दिवशी सक्रिय रुग्णसंख्येचा १५ हजारांचा आकडा एक हजारांच्या घरात आला होता. पण, मागच्या काही दिवसांत नवीन आढळणारे रुग्ण अधिक आणि कोरोनामुक्त कमी असे विषम प्रमाण झाले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील १३४० सक्रिय रुग्ण आहेत. यात ४५ बाहेर जिल्ह्यात तर १२९५ रुग्ण जिल्ह्यात सक्रिय आहेत.

हेही वाचा: ED चे व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर छापे; घराचीही झाडाझडती

‘म्युकर’ला ब्रेक-
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराच्या फैलावाला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मागच्या काही दिवसांत नवीन रुग्णवाढ आणि मृत्यूंची नोंद नाही. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १९७ इतकी झाली आहे. यापैकी ७८ रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात विविध शस्त्रक्रिया होऊन ते बरे झाले आहेत. तर याच ठिकाणी आणखी ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. चार रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

loading image