esakal | ED चे व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर छापे; औरंगाबादेतील बंगल्यातही झाडाझडती
sakal

बोलून बातमी शोधा

videocon

ED चे व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर छापे; घराचीही झाडाझडती

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: सक्तवसुली संचालनालयाच्या (Enforcement Directorate- ED) सहा पथकांनी व्हिडिओकॉन ग्रुपशी संबंधित राज्यभरातील मालमत्तांवर शुक्रवारी (ता.१६) एकाच वेळी छापे टाकले. ईडीचे एक पथक औरंगाबादेतील नक्षत्रवाडीतील बंगल्यावर येऊन धडकले, तर दुसऱ्या पथकाने मुंबईतील मलबार हिल आणि गोवंडीत छापे टाकले. सूत्रांच्या माहितीनुसार, हजारो कोटीच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. औरंगाबादेतील बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात येत होती. आफ्रिका खंडातील मोझांबिक येथील ऑइल फिल्ड प्रकरणाशी संबंधितही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉन उद्योग समूहाला २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने तीन हजार २५० कोटी कोटींचे कर्ज दिले होते. याशिवाय या उद्योग समूहाने देशभरातील विविध बँकांकडून तब्बल ४३ हजार कोटींचे कर्ज उचललेले आहे. हे कर्ज एसबीआयच्या नेतृत्वात तब्बल २० बँकांकडून घेण्यात आले होते. २०१० मध्ये ६४ कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले. ही कंपनी वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाइकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी सात सप्टेंबरला आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.

हेही वाचा: औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या ६ हजार लसी, आज ४० केंद्रांवर लसीकरण

चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन कंपनीचे मालक धूत यांनी मिळून एक कंपनी उभारली होती. या कंपनीलाही कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले, असाही आरोप आहे. त्यानुषंगाने ईडीचा तपास सुरू आहे. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांतच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे. ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक, धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

कर्ज ४६ हजार कोटी; तडजोड २९ कोटींची-
सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिडिओकॉन समूहाने विविध बॅंकांकडून ४३ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. दिवाळखोरी घोषित करून धूत बंधूंनी बँकांकडून घेतलेल्या ४३ हजार कोटींच्या कर्जापोटी तडजोडीअंती केवळ २९ कोटी रुपये भरले. या उद्योग समूहाला तब्बल ९६ टक्के कर्ज माफ करण्यात आले, मात्र ही कर्जमाफी संशयास्पद असल्याने शुक्रवारी धूत यांच्या राज्यभरातील स्थावर मालमत्तांवर छापे टाकल्याचे सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावरील अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार

मोझांबिक ऑइल फिल्ड प्रकरण -
मुंबई: आफ्रिका खंडातील मोझांबिक येथील ऑइल फिल्ड विक्रीतून कर्ज बुडवण्याप्रकरणी ‘ईडी’ने व्हिडिओकॉनशी संबंधित ठिकाणांवर दिल्ली, मुंबई व औरंगाबाद येथे छापे टाकले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्यावर्षी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर आता ईडीही याप्रकरणी तपास करत आहे. कर्जाची रक्कम इतरत्र वळल्याच्या संदर्भात कागदपत्रे मिळण्याच्या उद्देशाने शोधमोहीम राबवण्यात आली. हे प्रकरण मोझांबिकमधील तेलाच्या ब्लॉकशी संबंधित आहेत. याप्रकरणी व्हिडिओकॉनने लंडनमधील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून कर्ज घेतले. पुढे या व्यवहारातून बँकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. वास्तविक ऑइल फिल्ड विक्रीची रक्कम एसबीआय बँकेच्या नेतृत्वाखालील समूहाशी संबंधित खात्यात जाणे अपेक्षित होते; पण ती रक्कम इतरत्र वळवण्यात आली. त्यामुळे बँकांचे मोठे नुकसान झाले.

loading image