esakal | धक्कादायक! बीडमध्ये कोरोना मृत्यूनोंद आणि अंत्यसंस्कारात १०५ ची तफावत
sakal

बोलून बातमी शोधा

covid in beed

धक्कादायक! बीडमध्ये कोरोना मृत्यूनोंद आणि अंत्यसंस्कारात १०५ ची तफावत

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: कोरोना (covid 19) वॉर्डांमधील डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय काही अपवाद वगळता जीव तोडून काम करीत आहेत. पण, जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन संवेदनाहीन असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या शंभरावर मृत्यूंची (death by corona) पोर्टलवर नोंद करण्याचे गांभीर्यही प्रशासनाला नसल्याचे समोर आले आहे.

अंबाजोगाई व बीडमध्ये मृत कोरोनाग्रस्तांवरील अंत्यसंस्कार आणि पोर्टलवरील मृत्यूंच्या नोंदीत १०५ एवढी तफावत आढळली आहे. या प्रकारच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नेमली आहे. पोर्टलवर तत्काळ मृत्यूंची नोंद करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी स्वारातीचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सकांसह संबंधितांना दिले आहेत.

हेही वाचा: चांगली बातमी! मराठवाड्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय घट

काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईच्या स्वारातीमधून एकाच शववाहिकेतून दहाच्यावर कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नेल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारामुळे जिल्ह्याची राज्यभरात बेअब्रू झाली होती. असेच प्रकार जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनातही आहेत. आतमधील कोरोना वॉरिअर्स जीव तोडून काम करीत असले तरी (अपवाद वगळता) प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सिव्हिलवर कंट्रोल नसल्याने या मंडळींनाही त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, मार्च पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अलीकडे रोज दीड हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत.

हेही वाचा: औरंगाबाद विद्यापीठाचा गर्जे महाराष्ट्रसोबत करार

कोरोनाबळींचे आकडेही रोज २० ते ३० च्या घरात नोंदले जात आहे. मृत कोरोनाग्रस्तांवर अंबाजोगाई व बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, अंत्यसंस्कार व पोर्टलवरील मृत्यू याच्या नोंदीत मोठी तफावत आढळली आहे. जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती प्रशासनाला मृत्यूंची नोंद करण्याचे गांभीर्यच नसल्याचे दिसते. एप्रिल महिन्यात बीडमध्ये ११४ तर अंबाजोगाईत २६४ अशा ३७८ मृत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्काराची नोंद आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या पोर्टलवर केवळ २७३ मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे १०५ मृत्यूंच्या नोंदीची तफावत समोर आली आहे.

चौकशीसाठी समिती; तत्काळ नोंदीचे निर्देश

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी या प्रकरणी चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. स्वारातीच्या साथरोग विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. मेघराज भोंडवे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. बाबासाहेब ढाकणे, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, एकात्मिक रोग सर्वेक्षणाचे सांख्यिकी अधिकारी दीपक जायभाये यांचा समितीमध्ये समावेश आहे. सिव्हिल सर्जन, अधिष्ठातांसह इतर संबंधितांना तत्काळ मृत्यू नोंदीचेही निर्देश दिले आहेत.

उशिराची मृत्यूनोंद, इतर जिल्ह्यांतील मृत आणि सस्पेक्टेड रुग्णांच्या मृत्यूंचाही यामध्ये समावेश असू शकतो. मात्र, एवढा मोठा फरक कसा आला, याची माहिती घेतली जाईल. यासाठी प्रत्येक नगर पालिकेला पत्र पाठविले आहे.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

loading image
go to top