esakal | 'नियम पाळा, जिल्ह्यात रुग्ण वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध'
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

'नियम पाळा, रुग्ण वाढल्यास जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला जबर तडाखा देणारा कोरोना विषाणू संसर्ग ओसरत असल्याचे वाटत असताना चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या काहीशी वाढतच आहे. प्रमाणही अधूनमधून वाढत आहे. बाजारांमध्ये लोकांची गर्दी सर्वकाही सुरळीत असल्यासारखीच आहे. लोकांनी वर्तन सुधारले नाही अन् रुग्णसंख्येची वाढ कायम राहीली, तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची तंबी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सध्या लेव्हल तीनचे निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेलीच आहे. ता. १० पासून पाच दिवसांपैकी तीन दिवस रुग्णसंख्या दीडशेच्या पुढे आहे. दोन दिवस दीडशेच्या आत आहे. विशेष म्हणजे काही वेळा शेकडा प्रमाण सात टक्क्यांपर्यंत गेले. मंगळवारीही १५४ रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी रेट ५.९९ टक्क्यांवर गेला. त्यामुळे लोकांनी कोविडचे नियम पाळावेत, गर्दी टाळावी, असे आवाहन रवींद्र जगताप यांनी केले.

हेही वाचा: बीडकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला

शहर आणि ग्रामीण भागांत लोकांची गर्दी आणि घोळके कायम आढळत आहेत. म्हणूनच रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात पुन्हा कडक निर्बंधाचे वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरज असेल तरच बाहेर पडा, सुरक्षित अंतर पाळा, मास्क- सॅनिटायझर वापरा, शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी टाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जगताप यांनी केले. रेस्टॉरंट, हॉटेल या केवळ ५० टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात याव्यात. अन्यथा कार्यवाहीचा इशारा दिला आहे. सायंकाळी पाच नंतर संचारबंदी असल्याने आवश्यक कारणांसाठीच बाहेर पडावे. सध्या आपण लेव्हल तीनमध्ये असून जर चारमध्ये गेलो तर पुन्हा कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असे रवींद्र जगताप म्हणाले.

loading image