बीड क्राईम - अनैतिक संबंधाच्या संशयातून कोयत्याने चुलत्याचा हात तोडला

प्रशांत बर्दापूरकर
Tuesday, 23 June 2020

नागनाथ वैजिनाथ कांबळे असे या गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचे नाव आहे. नागनाथ आणि त्याचे भाऊ त्र्यंबक व गोपीनाथ हे चतुरवाडीत येथे शेजारी राहतात. नागनाथने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा पुतण्या अरुण त्र्यंबक कांबळे याला नागनाथचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्यातील चतुरवाडी येथे रविवारी (ता.२१) सायंकाळी अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुतण्याने वडील आणि दोन भावांच्या मदतीने चुलत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात चुलत्याचा मनगटापासून हात तुटला. या घटनेचा सोमवारी (ता.२२) येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नागनाथ वैजिनाथ कांबळे असे या गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचे नाव आहे. नागनाथ आणि त्याचे भाऊ त्र्यंबक व गोपीनाथ हे चतुरवाडीत येथे शेजारी राहतात. नागनाथने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा पुतण्या अरुण त्र्यंबक कांबळे याला नागनाथचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. रविवारी सायंकाळी पाच वाजता नागनाथ गायरानाच्या शेतातून कडबा आणण्यासाठी गेला असता, त्यास अरुण आणि त्र्यंबक हे दोघे बापलेक शेतात शेळ्या चारत असल्याचे दिसले. शेतात पेरायचे असल्याने नागनाथने त्यांना शेळ्या चारण्यास मज्जाव केला. त्यामुळे चिडलेल्या बापलेकांनी धावत येऊन हातातील कोयत्यांनी नागनाथवर हल्ला चढविला.

हेही वाचा - धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज, परळीकडे रवाना

यावेळी अरुणने डोक्यात केलेला कोयत्याचा वार अडविताना नागनाथचा हात मनगटापासून तुटला. त्यावेळी नागनाथची अन्य भावाची मुले नितीन आणि सचिन गोपीनाथ कांबळे हे धावत तिथे आले. या दोघांच्या मदतीने अरुण आणि त्र्यंबकने नागनाथच्या बरगडीवर आणि पायावर आणखी ५ ते ६ वार करून त्याला गंभीर जखमी केले. अरुण कोयत्याने नागनाथच्या मानेवर ठार मारण्याच्या उद्देशाने वार करणार तेवढ्यात आरडाओरडा ऐकून पळत आलेले दत्ता मोरे, बाबूराव जाधव यांनी त्याला बाजूला काढले. त्यानंतर त्या दोघांनी जखमी नागनाथला तातडीने येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून नागनाथला पुढील उपचारासाठी लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
या घटनेचा चारही आरोपींवर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक केंद्रे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Crime - Broken arm on suspicion of immoral relationship

Tags
टॉपिकस
Topic Tags: