ब्रीच कँडीतून डिस्चार्ज, धनंजय मुंडे परळीकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर कोरोनावर मात केली. त्यांचे दोन स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर सोमवारी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर कोरोनावर मात केली. त्यांचे दोन स्वॅब निगेटीव्ह आल्यानंतर सोमवारी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्राथनेमुळे माझी ही दुसरी चाचणीही निगेटीव्ह आल्याने डिस्चार्ज मिळाल्यामुळे मी ही मुंबईवरून गावी जात असल्याचे मुंडे या वेळी म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन व मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुंबईला गेल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे खासगी सचिव व दोन स्वीय सहाय्यक, चालक व स्वयंपाकी अशा सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड व अशोक चव्हाण यांच्यानंतर ते कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री होते. १२ तारखेला त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, यातील काही लोकांनी होम क्वारंटाईन राहूनच उपचार घेतले.

हेही वाचा - स्वॅब निगेटीव्ह येऊनही क्वारंटाईन

दरम्यान, मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थक व चाहत्यांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी देवाला प्रार्थना व साकडे घातले होते. दरम्यान, यातील दोघे रविवारीच कोरोनामुक्त झाले होते. सोमवारी धनंजय मुंडे यांची दुसरी चाचणीही निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आता मुंबईहून परळीकडे निघाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) पुन्हा नवीन चार कोरोनाग्रस्त आढळले. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या ११७ झाली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharge from Breach Candy, Dhananjay Munde left for Parli