धक्कादायक! सामूहिक बलात्कार पीडितेला ग्रामपंचायतीने गावातून केलं हद्दपार

वैजीनाथ जाधव
Thursday, 31 December 2020

दरम्यान सोमवारी पाचेगाव येथील ग्रामस्थ, महिला यांनी बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन या महिलेविरोधात निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

बीड: गेवराई तालुक्यातील एका गावात पाच वर्षांपूर्वी एका महिलेवर गावातीलच चार जणांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने या प्रकरणातील चारही आरोपींना गतवर्षी जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेला चारित्र्यहिन व व्याभिचारी म्हणत सदरील महिलेविरोधात तीन ग्रामपंचायतीने चक्क गावातून हद्दपार करण्याचा ठराव घेतला.

गावातील लोक एवढ्यावरच न थांबता ती चारित्र्यहिन व व्याभिचारी असल्याचा आरोप केला असून तिच्याविरोधात अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हाही देखील दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घडला आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत आतुरता; लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला रंग

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ता.१ जानेवारी २०१५ रोजी एक तीस वर्षीय महिला पाचेगाव येथील आपल्या शेतातील कापूस वेचणीचे काम उरकून सायंकाळी उशिरा बीडकडे निघाली होती. याचवेळी एक खासगी जीपचालकाने तिला गाडीत टाकून अन्य तीन साथीदारांसोबत एरंडगाव शिवारात तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी मागील वर्षी बीड जिल्हा सत्र न्यायालयाने सदरील चार आरोपींनी संगनमत करुन महिलेवर अत्याचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान याचाच राग मनात धरून गावातील लोकांनी संगनमत करून या महिलेला गावातून हाकलून देण्याकरीता पाचेगाव, वसंतनगर तांडा व जयराम नाईक तांडा या ग्रामपंचायतीने ता.१५ आॅगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन सदरील महिलेवर चारित्र्यहीन व व्याभिचारी असल्याचा आरोप करत गावातून हद्दपारीचा संतापजनक ठराव घेतला. दरम्यान सोमवारी पाचेगाव येथील ग्रामस्थ, महिला यांनी बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन या महिलेविरोधात निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

जातपंचायतीच्या दंडावरून उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणाचा खून; आईने केली तक्रार, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

सदरील प्रकरणी पीडित महिलेची पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी महिलेने टाहो फोडला. तर ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक यांच्यासमोर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत सदरील महिलेपासून गावाला धोका असल्याचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे. दरम्यान महिलेविरोधात घेण्यात आलेल्या ठरावावर ग्रामसेवक, सरपंच यांची सही असल्याने हा विषय अतिशय गंभीर झाला असून एका महिलेला चारित्र्यहिन ठरवत गावातून हद्दपार करण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तीन ही ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला
तीन ही ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला आहेत. महिलेपासून धोका असल्याचे निवेदन सदरील महिलेला पाचेगाव, वसंतनगर तांडा व जयराम नाईक तांडा या ग्रामपंचायतीने ठराव घेऊन गावातून हद्दपार करुन तिला चारित्र्यहिन व व्याभिचारी म्हटले आहे. या तिनही ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला आहेत. तर सदरील महिलेपासून गावातील नागरिकांना धोका आहे. तिची वागणूक समाजमान्य नाही. तिने यापूर्वी देखील अनेकांवर बलात्काराचे आरोप केले आहेत. नेहमीच विनयभंग, बलात्काराचे आरोप करुन नागरिकांना धमक्या देत असल्याने गावात भितीचे वातावरण आहे. तरी या महिलेची कोणतीही फिर्याद गावात शहानिशा केल्याशिवाय घेऊ नये असे निवेदन ग्रामस्थांनी पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed crime woman boycotted by gram panchayat