
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गटागटांमध्ये घासाघीस सुरू होती. कुठे निवडणुकीत उभारण्यासाठी मनधरणी तर कुठे निवडणुकीत उभे राहू नये, यासाठी विनवण्या सुरू होत्या.
लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गावकुसातील राजकारणाच्या हालचाली तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळाल्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गटागटांमध्ये घासाघीस सुरू होती. कुठे निवडणुकीत उभारण्यासाठी मनधरणी तर कुठे निवडणुकीत उभे राहू नये, यासाठी विनवण्या सुरू होत्या. मागील काळातील रूसवे - फुगवे काढताना पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली. यातूनच शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा सडा पडला आणि बहुतांश गावात दुरंगी लढतीचे चित्र पुढे आले.
जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी दोन तासाचा कालावधी वाढवून दिला होता. शेवटचा दिवस असल्याने बुधवारी सकाळपासूनच खलबते सुरू होते. विरोधी पॅनेलमधील उमेदवार पाहून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू होती. यातूनच गावातून निघून इच्छुकांनी तहसील कार्यालय गाठले. मात्र, अर्ज दाखल करण्यासाठी एकमेकांवर नजर ठेऊन प्रतीक्षा सुरू झाली. यातूनच अर्ज भरण्यापू्र्वी तहसील कार्यालयासोबत परिसरातील गल्लीबोळात गटागटाने कार्यकर्ते व पदाधिकारी चर्चा करताना दिसत होते.
काही ठिकाणी उमेदवारांची मनधरणी सुरू होती तर काही ठिकाणी विरोधी पॅनेलमध्ये जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू होते. शेवटच्या क्षणापर्यंत रूसवे - फुगवे काढून दिलजमाईचे प्रयत्न सुरू होते. यातूनच पॅनेलप्रमुखांना चांगलाच घाम फुटला होता. काही गावात उमेदवारांनी अचानक पॅनेल बदलल्यामुळे नवीन उमेदवार शोधताना पॅनेलप्रमुखांची कसरत झाली तर पॅनेलमधील उमेदवार दुसऱ्या पॅनेलमध्ये जाऊ नयेत, यासाठी नजर ठेऊन सर्वांची व्यवस्था करतानाही प्रमुख कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ आले होते.
तहसील कार्यालयात ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. असे असतानाही तहसील कार्यालयाचा परिसर वाहने व ग्रामस्थांच्या गर्दी फुलून गेला होता. सायंकाळी साडेपाचपर्यंत अर्ज दाखल झाले व त्यानंतर अर्जांची मोजदाद सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारी समोर आली नव्हती.
नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल
छाननीसाठी डावपेच सुरू
मोठ्या संख्येने दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरूवारी (ता. ३१) सकाळी अकरापासून छाननी होणार असून छाननी प्रक्रियेत विरोधी उमेदवाराला अपात्र ठरवून निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यासाठी डावपेच सुरू झाले होते. यातूनच काही पॅनेलप्रमुखांनी लागलीच वकीलांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे चित्र पहायला मिळाले. विरोधी पॅनेलमधील उमेदवारांच्या अर्जावर कोणते आक्षेप घ्यायचे, याचे नियोजन कार्यकर्त्यांकडून सुरू होते. त्यासाठी भक्कम पुराव्याची जमवाजमवही सुरू झाली होती. यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी गावच्या सत्ताकारणासाठी स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत.
(edited by- pramod sarawale)