बीड जिल्‍ह्यात जमावबंदी, संचारबंदी कायम; शिथिलतेत थोडी सूट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कृषी, मालवाहतूक, आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प त्यावर चालणाऱ्या घाऊक; तसेच किरकोळ दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे जी कामे ज्या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बीड - जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी आदेश कायम ठेवत शिथिलतेत काही प्रमाणात सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी (ता. २०) रात्री उशिरा निर्गमित केले. यामध्ये कृषी, मालवाहतूक, आरोग्य सेवा, जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे प्रकल्प त्यावर चालणाऱ्या घाऊक; तसेच किरकोळ दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे जी कामे ज्या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या बाबींच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

सार्वजनिक बस वाहतूक, रिक्षा, सिनेमागृहे, खरेदी संकुले, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे, बंदच राहतील. अंत्यसंस्कारास २० पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत. कृषी आणि कृषिविषयक सर्व कामांसाठी दिवसभर परवानगी असेल. बँकांच्या शाखा लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी पूर्ण होईपर्यंत नियमितपणे  सुरू राहतील, एटीएम सहकारी संस्था सुरू राहतील. सर्व शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील. सर्व प्रकारच्या वस्तूंच्या मालवाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

ग्रामपंचायतस्तरावर ग्राहक सेवा केंद्र व कुरिअर सेवा सुरू राहतील. फरसाण आणि मिठाईसह किराणा दुकान, रेशन दुकान, फळे, भाजीपाला, डेअरी, दूध केंद्रे, पोल्ट्री, मांस, मच्छी दुकाने, वैरण, चारा यांसाठीच्या दुकानांसाठी परवानगी देण्यात आली आहे. शासनमान्य ग्राहक सेवा, कुरिअर सेवा, शीतगृह, गोदामसेवा, लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी तसेच वैद्यकीय आणि आपत्कालीन कर्मचारी यांच्यासाठी हॉटेल, निवासस्थाने, लॉजही सुरू राहतील; मात्र जिल्ह्याअंतर्गत व राज्याअंतर्गत हालचाली बंद राहतील. नव्या आदेशातही प्रार्थनास्थळे, धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

कुठल्याही दुकानातून घेता येईल धान्य 
रेशनकार्ड पोर्टेबिलिटीसाठी दुकानदारांच्या अंगठ्याचा सॉफ्टवेअरमध्ये बंद करण्यात आला आहे. रेशनकार्ड धारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य मिळवू शकतो. रेशनकार्डधारक अंगठा वापरून रेशनकार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. जेव्हा कार्डधारकाचा अंगठा वापरला जातो तेव्हा स्वस्त धान्य दुकानमालकांनी साबणाच्या पाण्याने किंवा सॅनिटायझरने मशीन स्वच्छ करावी. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

बाहेरून आलेले मजूर गावाबाहेरच
जिल्ह्याबाहेरून आलेल्या ऊसतोड कामगारांसह कोणत्याही व्यक्तीस त्यांच्या वा इतरांच्या शेतात किंवा शाळेत राहण्याची सोय करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. अशांना गावातील त्यांच्या घरात अथवा गावात राहण्यासाठी परवानगी दिली असल्यास त्यांची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Beed district, the ban on mobs, the ban on communication continued