coronavirus - बीड जिल्हा कोरोनापासून दूर ठेवणार - धनंजय मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

बीड  जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. पुढेही सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोनापासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

बीड - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला, तरी जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे. येथून पुढेही सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोनापासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २१) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील उपस्थित होते. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

श्री. मुंडे म्हणाले, की कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत चांगले काम झाले आहे; परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, याप्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नयेत, यासाठी देखील खबरदारी घेतली जावी. यासाठी पोलिस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना श्री. मुंडेंनी पोलिस अधीक्षकांना केल्या. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नयेत, यासाठी लक्ष दिले जावे, अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरू होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयिस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावी, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district will be kept away from Corona -Danjay Munde