Coronavirus- युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

योगेश सारंगधर, औरंगाबाद 
Sunday, 12 April 2020

मुक्त स्वातंत्र्याचे पुरस्कृर्ते असणाऱ्या युरोपीयन देशात आज कोरोनाचा कहर झालाय. जेव्हा कोव्हिड १९ विषाणूने या देशांमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील सरकारनेही दर्जेदार आरोग्य सेवेच्या बळावर फारसे गंभीर घेतले नाही. परिस्थिती लक्षात येताच सरकारला धोका समजला. नंतर सरकारने नागरिकांना सावध करून जास्तीत जास्त घरात राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नागरिकांनी जुमानले नाही. आज अशी परिस्थिती आहे की ठोस कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास मोठा आर्थिक दंड भरावा लागतोय. इटलीसोबतच आता स्पेनमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीने स्पेनने आता इटलीलाही मागे टाकले आहे. साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्पेनमध्ये सध्या १ लाख ५८ हजार रुग्ण आहेत. आतापर्यंत तब्बल १६ हजार जणांनी जीव गमावलाय. युरोपीय देश कोरोनाचे संकट समोर आले तेव्हा बेफिकीर राहिले. उद्रेक वाढताच हालचाली केल्या. या संकटाच्या मुकाबल्यासाठी आता युरोपातील सर्व देशांनी संयुक्त कृती करायला हवी, अशी अपेक्षा स्पेनमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. जॉन कार्लोस यांनी व्यक्त केलीय. यासंदर्भात ‘सकाळ’ने त्यांच्याशी साधलेला संवाद. 

प्रश्न - स्पेन सरकार काय उपाययोजना करतेय? 
डॉ. जॉन कार्लोस - १६ मार्चपासून स्पेनमध्ये लॉकडाऊन आहे. कदाचित, आम्ही मे महिन्यापर्यंत घरीच बंद राहू. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आणि सैन्य रस्त्यावर उतरलेय. सरकारच्या नियमांचे पालन न केल्यास आता कठोर कारवाई केली जातेय. बाहेर पडल्यास १०० ते ६०० युरो (आठ ते ५० हजार रुपये) दंड वेगवेगळ्या प्रकरणांत होऊ शकतो. त्यामुळे आता नागरिकही नियमांचे काटेकोर पालन करताहेत. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

प्रश्न - युरोपातील देशांचे सरकार कोठे चुकले? 
डॉ. जॉन कार्लोस -  मी हे संकट व्यवस्थापित करताना दोन चुका पाहिल्या आहेत. काही सरकारांनी नियोजन करताना उशीर लावला. प्रत्येक देशाने या संकटाविरुद्ध वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र, सर्व युरोपीय देशांनी संयुक्त कृती केली पाहिजे. 

प्रश्न - स्पॅनिश नागरिकांचा दिनक्रम कसा आहे? 
डॉ. जॉन कार्लोस - मी रसायनशास्त्रात पीएच.डी. केली आहे. ‘कोविड १९’मुळे सध्या घरून काम करतोय. मी हायस्कूलच्या व्यवस्थापनात आहे. सकाळी व दुपारी मी ऑनलाइन काम करतो. उर्वरित वेळ माझी मुलगी आणि मुलासमवेत घरी व्यायाम करणे, चित्रपट पाहण्यात घालवतो. कधीकधी सकाळी मी कार्यालयात जातो. आठवड्यातून दोन दिवस खरेदी करतो. मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझरचा वापर करतोय. मी पत्नीसह मुलगा (वय १४) व मुलगी (वय १२) घरातच असतो. मुलांचा अभ्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

प्रश्न - तुम्ही भारताकडे कसे पाहताय? 
डॉ. जॉन कार्लोस ः साथीच्या रोगानंतर आर्थिक समस्येवर तोडगा काढावा लागेल. मी आठवड्यातून दोन-तीन वेळा भारतातील शिक्षक मित्र आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधतो. सुरक्षित राहा आणि शासकीय नियमांचे अनुसरण करावे, अशी विनंती करतोय. स्पॅनिश पर्यटकांना भारतातून परत येण्यासाठीच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. 

प्रश्न - कोरोना विषाणूचे संकट किती काळ टिकेल? 
डॉ. जॉन कार्लोस -
मला वाटते की आम्ही दोन महिने तरी सामान्य परिस्थितीत परत येणार नाही. आरोग्य आणीबाणी राहील. आर्थिक मंदी येईल. सर्वच क्षेत्रांवर परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल. युरोपातील नागरिकांच्या मूलभूत उत्पन्नाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All countries in Europe should now take joint action - Dr. Joun Carlos