बीड जिल्ह्याचे कोरोना मीटर थांबेना; पुन्हा चार रुग्ण, बालकालाही बाधा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

बेनसुर (ता. पाटोदा) येथील वृद्धाला कोरोना बाधा असल्याचे पुण्यात समोर आले. तर, जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, केज व परळीचे उपजिल्हा रुग्णालये, आष्टी व माजलगावचे ग्रामीण  रुग्णालये, त्याच बरोबर बीड व अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरमधून १९७ लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले.

बीड - बीड जिल्ह्यात सुरू झालेले कोरोना मीटर थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. बाहेरून आलेले आणि संपर्कातील लोक कोरोनाबाधित आढळत आहेत. सोमवारी (ता. सहा) पुन्हा चार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. परळीच्या स्टेट बँकेतील आणखी दोघांना बाधा झाल्याचे समोर आले. 

सोमवारी दुपारी बेनसुर (ता. पाटोदा) येथील वृद्धाला कोरोना बाधा असल्याचे पुण्यात समोर आले. तर, जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, केज व परळीचे उपजिल्हा रुग्णालये, आष्टी व माजलगावचे ग्रामीण  रुग्णालये, त्याच बरोबर बीड व अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरमधून १९७ लोकांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले. याची तपासणी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाली. यात तिघे पॉझिटीव्ह आढळून आले. १८६ थ्रोट स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असून आठ स्वॅब नमुन्यांचे अहवाल अनिर्णित राहीले. दरम्यान, कोरोनाबाधींचा आकडा आता १६० वर पोचला आहे. आतापर्यत सात जणांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - बीड, केज, परळीत बियाणे कंपन्यांविरुद्ध सहा गुन्ह दाखल

परळीच्या एसबीआयमधील आणखी दोघे बाधीत
दरम्यान, सोमवारी परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियामधील दोन कर्मचारी बाधीत आढळले. एक परळीतच राहत असून दुसरा ४५ वर्षीय कर्मचारी अंबाजोगाई येथील मोरेवाडी येथील शिक्षक कॉलनीतील आहे. धारुर येथील मुंबईहून परतलेल्या दहा वर्षीय बालकालाही बाधा असल्याचे समोर आले. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांत सर्वाधिक रुग्ण बीड शहरात आढळले आहेत. मागच्या काही दिवसांत शहरात रुग्ण आढळतच होते. सोमवारी मात्र बीडमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. 

हेही वाचा - मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, बलिदान देणाऱ्यांचा विसर

३८ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार
सध्या ३८ रुग्णांवर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी उपचार सुरू आहेत. बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात, अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व अंबाजोगाईच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.  सुरुवातीला एखाद दुसरा स्वॅब घेतला जाणाऱ्या जिल्ह्यात नंतरच्या काळात शंभरच्या घरात स्वॅबची संख्या गेली. आता हा आकडा दोनशे ते अडीचशेपर्यंत जात आहे. जास्तीत जास्त लोकांची तपासणी व्हावी व त्यातून जर कोरोनाग्रस्त आढळले तर त्याच्यावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी आरोग्य विभागाने जादा स्वॅब घेण्याचे ठरविले आहे. संशयितांसह बाहेर जिल्ह्यातून आलेले, शासकीय तसेच खासगी दवाखान्यांतील डॉक्टर व स्टाफ तसेच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातल लोकांचे स्वॅब घेतले जात आहेत. आता यापुढे रोजच हा आकडा दोनशेच्या घरात असेल. संशयित, संपर्कातील लोकांना ठराविक ठीकाणी आणून त्यांचे स्वॅब घेण्यामुळे वेळ व यंत्रणेचा अधिक वापर होत होता. त्यामुळे यापुढे सर्व तालुक्यांच्या ठिकाणी स्वॅब घेतले जाणार आहेत. तसेच पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी सर्व तालुका अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district's corona meter will not stop; Again four patients