esakal | बीड, केज, परळीत बियाणे कंपन्यांविरुद्ध सहा गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेऊन कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

बीड, केज, परळीत बियाणे कंपन्यांविरुद्ध सहा गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - कायम अडचणींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात निकृष्ट व बोगस बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कृषी विभागाने थेट फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांना आता भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. बीड व केज, परळी या तीन तालुक्यांत जानकी, यशोदा, ग्रीन गोल्ड, बसंत ॲग्रोटेक, महागुजरात, वरदान या कंपन्यांविरोधात सहा गुन्हे नोंद झाले आहेत. इतर तालुक्यांतही गुन्हे नोंद करण्यासाठी माहिती गोळा करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले विविध कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेऊन कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या मागील आठ-दहा दिवसांपासून १८ पथकांच्या माध्यमातून जिल्हाभरात न उगवलेल्या सोयाबीनचे पंचनामे केले. पंचनाम्यातून निष्पन्न झालेल्या अहवालाच्या माध्यमातून पंचायत समितीचे कृषी अधिकारी व शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी गुन्हे नोंद करत आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाई भेटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे कृषी विभागातील जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा - खतासाठी पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्याने संपविले जीवन

दरम्यान, सदोष सोयाबीन बियाण्यांचे वितरण आणि विक्री करून शेतकऱ्‍यांचे १५ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी जानकी सीड्स अॅण्ड रिसर्च प्रा. लि. म्हैसपूर (जि.अकोला), यशोदा हायब्रीड सीड्स हिंगणघाट (जि.वर्धा) या दोन बियाणे कंपन्याविरुद्ध बीड शहर ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर, ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि. (औरंगाबाद) या कंपनीविरुद्ध परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत बीड पंचायत समितीचे कृषी अधिकारी भुजंग खेडकर यांनी बीड शहर ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदवली. जानकी सीड्सच्या बियाणांबाबतीत ११७ तर यशोदा सीड्सचे बियाणे उगवले नसल्याच्या ४० अशा एकूण १५७ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

हेही वाचा - स्कॉर्पिओखाली चिरडून बीड जिल्ह्यात एक जण ठार

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जानकी सीड्स ॲ‍ण्ड रिसर्च प्रा.लि. कंपनीसह त्यांचे जबाबदार व्यक्ती अनिल रमेश धुमाळे व यशोदा हायब्रीड सीड्स हिंगणघाट या कंपनीसह प्रदीप माणिक पाटील यांच्याविरुद्ध बियाणे कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. परळीत ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि. (औरंगाबाद) या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी सोयाबीनचे वाण जी - ३३४४, जे ३५५३, जी ३०६ व इतर वाणांच्या बियाणांचा पेरा पेरणी झालेल्या ठिकाणी पाहिला असता कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाल्याची फिर्याद दिली. 

या कंपनीसह व्यवस्थापक संदीप मच्छिंद्र बावसकर (रा.गंगापूर, जि.औरंगाबाद) विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला; तसेच शहर ठाण्यात शहर पोलिस ठाण्यात बसंत अॅग्रोटेक कवलखेड अकोला या बियाणे कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेषराव लिंबाजी कांदे यांनी फिर्याद दिली. कंपनीने येथील वितरक महेश टीन ॲण्ड फर्टिलायझर्स यांच्यामार्फत तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम सोयाबीन बियाणांचा पुरवठा केला आहे. सोयाबीन न उगवल्याबाबत १८३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रार निवारण समिती समवेत २८ शेतकऱ्यांच्या सोयाबीन पेरलेल्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यात सोयाबीन वाण जेएस ३३५, एस १२०८ संकल्प व इतर बियाणांचा पेरा पाहिला ते बियाणे पाच टक्के उगवले आहे. यावरून कंपनीचे व्यवस्थापक गजानन काळे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकसिंगे करत आहेत. 

हेही वाचा - बीडची भाजप पुन्हा उभारी घेणार, प्रीतम मुंडे प्रदेश उपाध्यक्ष

केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्यावरून वरदान बायोटक प्रा. लि. उज्जैन (मध्यप्रदेश) या कंपनीचे जेएस ३३५ व इतर वाण यांचे बियाणे उगवले नाही अशी फिर्याद पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमोल डाके यांनी दिली. यावरून कंपनीचे लोकेंद्र राजपूत व लक्ष्मी राजपूत या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. मिसळे करत आहेत. याच ठिकाणी दुसरा गुन्हा तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. यावरून महागुजरात सीड्स कंपनीचे अशोक नथुराम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे व पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करत आहेत.