

Beed False Cases Claim
esakal
बीड : वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, खंडणी, खून, अपहरणासारख्या घटनांनी बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात, अशी खळबळजनक कबुली अपर पोलिस अधीक्षकांनीच दिली. आधीच या ना त्या कारणाने नित्य चर्चेत राहणाऱ्या येथील पोलिस दलासाठी हा घरचा आहेर म्हणजे डोकेदुखीच ठरणार आहे.
पिंपळनेर प्रकरणातील गंभीर गुन्ह्याबाबत असे खूप गुन्हे होतात, असे उडवाउडवीचे उत्तर देत केलेल्या अपर अधीक्षकांच्या विधानाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सर्व पोलिस ठाणेप्रमुख, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे आक्रमक धोरण राबवत आहेत. मात्र, त्यांच्या या धोरणाला खात्यातील वरिष्ठ सहकाऱ्याकडून कसा हरताळ फासला जातो, हे अपर पोलिस अधीक्षकांच्या बेजबाबदार विधानाने समोर आले आहे.
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यासाठी येथे गुरुवारी (ता.२४) अपर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. यावेळी समीर शेख यांनी चक्क बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात, असे एका प्रश्नावर सांगितले. अंथरवण पिंपरी तांडा (ता. बीड) येथील हाणामारीत गंभीर जखमी झालेले बबन पवार यांचा बुधवारी (ता. २३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर आक्रमक नातेवाइकांनी बबन पवार यांचा मृतदेह थेट पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणून आंदोलन केले.
आमच्या माणसाला मारहाण करून त्याचा जीव घेण्यात आला, तरीही उलट आमच्यावरच हाफ मर्डर (कलम ३०७) सारखे गंभीर आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा नातेवाईकांचा आरोप होता. याच घटनेचा संदर्भ देत, ‘‘खासदारांच्या पुत्रावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून ज्या प्रकारची दक्षता व काळजी घेतली जाते, तशी काळजी सर्वसामान्य नागरिकांनी आम्ही कुठेच नसल्याचे ठोस पुरावे देऊनही पोलिस प्रशासनाकडून का घेतली जात नाही.
सर्वसामान्यांच्या बाबतीत पक्षपातीपणा का होतो, ’’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर अपर पोलिस अधीक्षक शेख म्हणाले, ‘‘बीड जिल्ह्यात सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात.’’ एका जबाबदार वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्याकडून अशी जाहीर कबुली दिल्याने, बीड जिल्ह्यात राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जातात, या आरोपावरच एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.