
बीड : शासकीय धान्याला फुटले पाय; पोत्यामागे तीन किलो कमी
बीड : गरीबांसह विविध घटकांना रास्त दराने वाटप करण्यासाठी शासकीय गोदामांत येणाऱ्या धान्याला पाय फुटले आणि पोत्यामागे दोन - तीन किलो वजन कमी भरले. आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या पाहणीतच हा प्रकार समोर आला. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.
शासनाकडून विविध घटकांतील लाभार्थींसाठी गहू - तांदूळ व इर धान्य रास्त दराने उपलब्ध करुन दिले जाते. शासनाकडून उपलब्ध होणारे धान्य अगोदर शासकीय गोदामांत साठविले जाते. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थींना वाटप केले जाते. स्वस्त धान्य दुकानदारांसह धान्य माफियांकडून हे गरिबांचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचे प्रकार बीड जिल्ह्यात अनेकदार समोर आले आहेत.
मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोचणारे ५० किलो वजनाचे कट्टेही दोन - तीन किलोने कमी असतात. मात्र, गरिबांची लुट (लाभार्थींकडून अधिक भाव घेण्यामुळे व अनेकांचे धान्य काळ्या बाजारात विकायचे असल्याने) करण्यामुळे मिंधे असलेले बहुतांशी स्वस्त धान्य दुकानदार पोत्यांमधील धान्य कमी वजनाचे असल्याबाबतची तक्रार कधीच करत नाहीत. कारण, गरिबांच्या धान्यावर जगणारी मोठी साखळीच असते. मात्र, काही दुकानदारांनी याबाबत आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर रविवारी (ता. १४) श्रीमती मुंदडा, नंदकिशोर मुंदडा व समर्थक महसूल विभागाच्या अंबाजोगाईच्या शासकीय गोदामात अचानक धडकले. त्यामुळे गोदामातील धान्य चोरांची चांगलीच तांराबळ उडाली.
मात्र, जोपर्यंत धान्यांचे पोत्यांचे वजन मोजले जात नाही व त्याचा रितसर पंचनामा होत नाही तोपर्यंत गोदाम सोडणार नाही, अशी भूमिका या मंडळींनी घेतली. मग, त्यांनी दुपारचे जेवणही गोदामातच घेतले. यामुळे धान्य चोरांची चांगलीच पाचावर धारण बसली. अखेर तहसिलदार विपीन पाटील, नायब तहसिलदार मिलींद गायकवाड, गोदामपाल श्री. बलुतकर, दक्षता समिती सदस्य बालाजी शेरेकर, ॲड. संतोष लोमटे, नूर पटेल, अहमद पप्पूवाले आदींच्या समक्ष गोदामातील ६० धान्य कट्ट्यांचे वजन केले तर प्रत्येक कट्ट्यांत दोन ते तीन किलो धान्य कमी आढळले.
म्हणजे एकही पोते ५० किलो आढळले नाही. या धान्याला पाय कसे फुटले आणि गरिबांचे धान्य कोणाच्या तोंडात जात होते असा प्रश्न आहे. इथे आमदारांच्या तपासणीत उदाहरण म्हणून हा प्रकार समोर आला असला तरी इतर ठिकाणच्या धान्य चोरीचे काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.