
बीडचा जालना रोड बनला ‘वाहतूक कोंडी’ चे केंद्र
बीड : चोऱ्या-माऱ्या, अत्याचार अशा कायदा व सुव्यवस्थेचे मुख्य काम करणाऱ्या पोलिस यंत्रणेकडे स्वतंत्र वाहतूक शाखाही आहे. बीडमध्ये यासाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षकासह मोठे मनुष्यबळ आहे. मात्र, जालना रोड सध्या ‘वाहतूक कोंडी’ केंद्र झाला असताना वाहतूक शाखा नेमकी कुठे? असा प्रश्न आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या पत्र्याच्या बस भर उन्हात अर्धा - पाऊण तास एकाच जागी थांबल्याने आतमधील प्रवाशांचा जीव तगमग होतो. परंतु, बहुधा उन्हामुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी, वाहनांना वाट दाखविण्यासाठी या शाखेच्या कर्मचाऱ्यांना थांबू वाटत नसावे. केवळ उन्हामुळे तगमगच नाही तर वेळ जाऊन आता आडवी-तिडवी वाहने चालविण्यामुळे अपघातांचे प्रकारही वाढले आहेत.
कहर म्हणजे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार यंत्रणेची कामाची गती तर मंद आहेच. शिवाय रस्त्याचे काम करताना ‘काम सुरु आहे, रस्ता अमुक दिशेने सुरु आहे’, अशा विविध प्रकारच्या सूचनावजा आणि दिशादर्शक फलक लावण्याच्या जबाबदारीकडे आणि पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याकडे पुरता कानाडोळा केला जात असताना संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी देखील गप्प आहेत. शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पाच वर्षांपासून रखडले होते. या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनचालक आणि बीडकरांनी पाच वर्षे खस्ता खाल्ल्या. अखेर या रस्त्याच्या मजबुतीकरणास काही महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली.
इकडे बाह्यवळण रस्ता ते राष्ट्रवादी भवन व बाह्यवळण रस्ता ते काकू - नाना हॉस्पिटल अशा दोन्ही बाजूंनी प्रत्येकी चार अशा आठ किलोमीटरचे डांबरीकरण व राष्ट्रवादी भवन ते काकू - नाना हॉस्पिटल हे चार किलोमीटरचे सिमेंटीकरण असे काम मंजूर झाले. डांबरीकरणाचे काम गतीने उरकले. पण, सिमेंटीकरण करणे बीडकरांसाठी डोकेदुखी ठरले. अडीच महिन्यांपूर्वी सिमेंटीकरणासाठी पूर्वीचा डांबरीकरणाचा थर खोदून ठेवला. त्यात महिनाभर बीडकरांना धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर रस्ता कामाला सुरुवात झाल्यानंतर रोज पाचशे मीटर एका बाजूचे काम केले जात आहे. नेमका हा रस्ता वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आणि शहर याच रस्त्याच्या पूर्व व पश्चिमेला असल्याने इकडून - तिकडे जाण्यासाठी हाच रस्ता ओलांडावा लागणारा आहे.
परंतु, रस्ता काम करणाऱ्या यंत्रणेने कुठेही दिशादर्शक लावले नाहीत. काम सुरु असल्याचा व वाहतूक बदलल्याचा फलक लावलेला नाही. वास्तविक काम करताना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी योग्य ठिकाणांहून दिशादर्शक व सूचना फलक लावणे बांधकाम विभाग व काम करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र असे कुठेही झालेले नाही.
दुभाजक बनले पार्किंग झोन
धुळे - सोलापूर रस्ता हा प्रचंड वर्दळीचा रस्ता आहे. बसस्थानकापासूनच कामाला सुरुवात झाली आहे. अगोदर बसस्थानक ते जालना रोड व आता बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असे काम करण्यात येत आहे. एका बाजूने रस्ता होत असल्याने ये - जा करणारी वाहने एकाच बाजूने चालवावी लागतात. त्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहने बसच्या सांधीतून आडवी येतात. त्यामुळे वाहतूक अर्धा - ते पाऊण तास ठप्प होते. त्यात १० इंच उंचीच्या सिमेंट थरावरून छोटी वाहने चढ-उतार करत असल्याने त्यात अपघाताचे प्रकारही घडत आहेत.
किरकोळ अपघाताचे सत्र रोजच सुरु आहे. मात्र, दुभाजकाच्या आडून छोटी वाहने बससमोर आल्याने मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या काळात वाहतूक शाखेने अलर्ट असणे अपेक्षीत आहे. मात्र, बहुधा उन्हाचा त्रास या शाखेला नको असावा. एरव्ही मात्र राँग साईड वाहन, नो पार्किंगमध्ये वाहन, ट्रिपल सिट, पासींग, लायसेन्स नाही (फक्त ग्रामीण भागातून आलेल्यांनाच) असे म्हणून कारवायांचा बडगा उगारणाऱ्या यंत्रणेला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काहीही देणे - घेणे दिसत नाही. त्यात सुभाष हे शहरातील प्रमुख व्यापारपेठ आहे. सध्या लग्नसराई असल्याने या रस्त्यावर खरेदीदारांची मोठी गर्दी आहे.
खरेदीदारांची वाहने केवळ दुकानांसमोरच नाही तर अर्ध्या रस्त्यापर्यंत पार्क केली जातात. दुभाजक तर जणू पार्किंग झोन झालेला आहे. मात्र, या रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे वाहतूक शाखेसोबत असलेले ‘ऋणानुबंध’ वाहनचालकांवरील कारवाईस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे या रस्ता देखील वाहतूक कोंडी केंद्रच झाला आहे.
मोठ्या अपघाताची शक्यता
दहा इंच सिमेंट रस्त्यावर दुचाकी चढविताना दुचाकी पडून अपघातांचे प्रकार घडले आहेत. मात्र, दुभाजकांच्या आडून अचानक दुचाकी बसला आडवी येताना बस चालकाला दिसत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही.