मुंडे बंधू-भगिनीचा दबदबा राज्यभर, तरी सामान्य परळीकर रोजगारपासून दूरच

dhanajay munde and pankaja munde
dhanajay munde and pankaja munde

परळी: परळी तालुका राजकारणात संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. भाजपचे केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, विद्यमान  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केला आहे. मात्र असे असताना तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण मात्र मोठे आहे. बेरोजगारांसाठी कोणतेही मोठे उद्योग तालुक्यात आले नाहीत. एमआयडीसीचा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून पेंडींग आहे.

तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असते. येथील नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण नेहमीच महत्वाची भूमिका पार पाडत आपला दबदबा निर्माण केला आहे. असे असताना तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा कोणताही उद्योग तालुक्यात आणला नाही. तालुक्यात सध्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. या उद्योगातच फक्त हजारभर बेरोजगारांना काम मिळत आहे. पण याचाही काही भरोसा नाही. कारण विज निर्मिती करत असताना विजेचा खर्च जास्त होतो म्हणून किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी नाही, कोळसा उपलब्ध नाही म्हणून विज निर्मिती अधूनमधून बंद केली जाते.

ज्या युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. ते पण लेबर म्हणूनच मोठ्या संख्येने आहेत. इंजिनिअर, विज निर्मितीसाठी लागणारे साहित्य पुरवणारे गुत्तेदार म्हणून अत्यंत कमी प्रमाणात आहेत. शहर व तालुक्यातील हजारो युवक, बेरोजगार मोठ्या संख्येने पुणे, मुंबई येथे काम मिळवण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. कारण प्रशिक्षित बेरोजगारांना सहज हाताला काम मिळेल असा कोणताही उद्योग तालुक्यात नाही. भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना १९९५-९६ मध्ये तालुक्यातील नाथरा, वडखेल परिसरात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते एमआयडीसीचे थाटात उद्घाटन केले होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे  ही एमआयडीसी मात्र कार्यरत होवू शकली नाही. त्यावेळेस पासून एमआयडीसीचा प्रश्न लोंबकळत पडला आहे.

गोपीनाथराव मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखानाची सुरुवात केली. याठिकाणी काही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कारखान्याच्या विज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल प्रकल्प सुरू झाल्याने रोजगारात वाढ झाली होती पण हेही बंद असल्याची चर्चा आहे. यानंतर गोपीनाथराव मुंडे यांचे जेष्ट बंधू पंडितराव मुंडे यांनी सुतगिरणीची सुरुवात केली. यामध्ये काही बेरोजगारांना रोजगार मिळाला पण काही कारणाने तीही बंद पडली. ग्रामविकासमंत्री असताना पंकजा मुंडे यांनी एमआयडीसी संदर्भात प्रयत्न केले, मात्र ती काही कार्यरत होवू शकली नाही, किंवा कोणताही मोठा उद्योग तालुक्यात आलेला नाही.

तसेच विद्यमान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एमआयडीसी संदर्भात काही महिन्यांपूर्वी प्रयत्न सुरू केले आहेत. एमआयडीसीच्या जागेची पहाणी करून ही एमआयडीसी सिरसाळा परिसरात होणार असे अधिकाऱ्यांनी सांगितले, पण पुढे मात्र हाही विषय पेंडींगच पडला आहे. सिरसाळा परिसरातील मलनाथपूर येथे सोलार उर्जाचा प्रोजेक्टर आणला असून याठिकाणी २०० - ३०० बेरोजगारांना काम मिळाले, याबरोबरच एखादा मोठा उद्योग तालुक्यात सुरू होणे आवश्यक आहे. ज्यामुळे येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. यासाठी एमआयडीसीचे काम मार्गी लागून मोठे उद्योग येथे येणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय नेत्यांची इच्छा शक्ती पणाला लावून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेवर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विटभट्टी उद्योग सुरू झाला आहे. मात्र याठिकाणी काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणावर हिंगोली, परभणी, आष्टी, पाटोदा परिसरातील आहेत. विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये तालुक्यातील कामगार मात्र नाहीत. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. रात्रंदिवस चिखला मातीत व राखेत,धुळीत काम करावे लागते. यामुळे याठिकाणी काम करणारे कामगार बाहेर जिल्ह्यातीलच असल्याचे दिसून येते.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com