esakal | रुग्णालयाच्या आवारातच केली प्रसूती, परिचारिकांचा सेवाभाव...

बोलून बातमी शोधा

beed news
रुग्णालयाच्या आवारातच केली प्रसूती, परिचारिकांचा सेवाभाव...
sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: शासकीय दवाखान्यांत परिचारिकांकडून रुग्ण व नातेवाइकांना उद्धट बोलणे, परिसरात अस्वच्छता अशा तक्रारी नित्याच्या आहेत. मात्र, परिचारिकांमधील सेवाभाव आणि माणुसकी जिवंत असल्यानेच कोविडच्या या मोठ्या संकटाशी आपण लढा देऊ शकत आहोत. परिणामी, गरिबांना मोफत उपचारही भेटत आहेत. याचा नुकताच प्रत्यय शनिवारी (ता. २४) अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला. परिचारिकांनी एका महिलेची तत्परतेने रुग्णालयाच्या आवारातच झाडाखाली सुखरूप प्रसूती केली.

पूर्ण दिवस भरलेले व प्रसूतीकळा सोसत येल्डा (ता. अंबाजोगाई) येथून रिक्षामध्ये आलेली ३० वर्षीय महिला लेबररूम (प्रसूतीकक्ष) पर्यंत पोचूच शकत नव्हती. तिची तत्काळ प्रसूती आवश्यक होती. याच वेळी अधिपरिचारिका चित्रलेखा बांगर व अधिपरिचारिका रागिणी पवार अधिष्ठाता कार्यालयाकडून आपापल्या वॉर्डांकडे निघाल्या होत्या. त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी लागलीच महिलेला झाडाखालीच बसविले. एवढ्या वेळेत स्त्रीरोग तज्ज्ञही पोचणे कठीण होते म्हणून त्यांनी पळत जाऊन प्रसूती साहित्य आणले आणि सोबतच्या महिला नातेवाइकांना आणि इतर स्टाफला आडोसा करायला लावला.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

याच ठिकाणी चित्रलेखा बांगर व रागिणी पवार या दोघींनी महिलेची सुखरूप प्रसूती पार पाडली. नंतर बाळ व नवमातेला प्रसूती कक्षात हलविले व डॉक्टरांना याची कल्पना दिली. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून, त्यांच्यावर उपचारही सुरू आहे. दरम्यान, सरकारी दवाखान्यांत मोफत उपचार भेटतात. पण, कागदपत्रांची पूर्तता, तपासण्या आणि त्यात आतमध्ये कर्मचारी व परिचारिकांकडून अनेकदा नातेवाइकांना चढ्या आवाजात बोलण्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे अनेकदा ऐपत नसतानाही सामान्य लोक खासगी दवाखान्यांत जातात.

हेही वाचा: अंबाजोगाईत दोन दिवसांत तीस जणांवर अंत्यसंस्कार, पालिक कर्मचाऱ्यांनी दिला अग्नि

साधारण प्रसूतीसाठी १५ ते २० हजार व रिझेरिअनसाठी ४० हजारांपर्यंत रक्कम मोजतात. मात्र, प्रत्येक गोष्टींना अपवाद असतो, हे या प्रसंगातून दिसून आले. अनेक परिचारिका, ब्रदर, वॉर्डबॉय माणुसकी आणि सेवाभाव जिवंत असलेले आहेत. त्यांच्या बळावरच शासकीय आरोग्य यंत्रणेचा कणा ताठ आहे आणि हजारो गरीब रुग्णांना मोफत उपचारही भेटत आहेत.

अशा १५ ते २० प्रसूती आम्ही केल्या आहेत. अनेक महिला कळा आल्यानंतरही घरी राहतात. उशिरा रुग्णालयात निघतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लेबर रूमपर्यंत त्या पोचू शकत नाहीत. त्यामुळे बाहेरच रिक्षा, रुग्णवाहिकांमध्ये त्यांची प्रसूती करावी लागते.

- चित्रलेखा बांगर, अधिपरिचारिका तथा, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य परिचारिका सेवा संघ.