esakal | अपक्षांमुळे डिसीसीच्या आठ जागांसाठी ट्विस्ट, राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेनेचे पॅनल
sakal

बोलून बातमी शोधा

Beed District Cooperative Ban Elections

मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पतंग तर भाजपच्या उमेदवारांना कपबशी अशी एकसारखी चिन्हे मिळाली आहेत.

अपक्षांमुळे डिसीसीच्या आठ जागांसाठी ट्विस्ट, राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेनेचे पॅनल

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी तीन पॅनलसह अपक्षांनीही जोर लावल्याने निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने पॅनल तयार केले आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पतंग तर भाजपच्या उमेदवारांना कपबशी अशी एकसारखी चिन्हे मिळाली आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार आहे. रिंगणातील ४१ उमेदवारांत तब्बल २१ अपक्ष आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली. मात्र, सेवा सहकारी सोसायटीच्या ११ मतदार संघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने केवळ आठ मतदार संघांची निवडणूक होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेनेही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

निवडणूक रिंगणातील बदामराव पंडित एकमेव माजी आमदार आहेत. त्यांची लढत इतर शेती संस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल आंधळे व भाजपचे धनराज मुंडे यांच्यासोबत आहे. या मतदार संघातून फुलचंद मुंडे, नवनाथ शिराळे, शहादेव हिंदोळे आदी सात अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे इथे अगदीच चुरस पाहायला मिळणार आहे. पगारदार पतसंस्था व नागरी बँक मतदार संघातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी अपक्ष लढत आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे गंगाधर आगे, भाजपच्या संगीता लोढा व शिवसेनेचे चंद्रकांत सानप यांच्यासोबत असेल.

औरंगाबादेत दररोज वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या, सात जणांचा मृत्यू

रंगनाथ धोंडे, सत्यसेन मिसाळ देखील या मतदार संघातून अपक्ष लढत आहेत. प्रक्रिया मतदार संघातून राष्ट्रवादीचे भाऊसाहेब नाटकर यांची लढत भाजपच्या संगीता बडे व शिवसेनेचे जगदीश काळे यांच्यासोबत आहे. इतर मागासवर्ग मतदार संघातून राष्ट्रवादीकडून सावता परिषदेचे कल्याण आखाडे तर भाजपकडून राजेश धोंडे आणि शिवसेनेकडून दिनेश परदेशी रिंगणात आहेत. विमुक्त जाती / भटक्या जमाती मतदार संघातून राष्ट्रवादीकडून सूर्यभान मुंडे तर भाजपकडून श्रीमंत जायभाये शिवसेनेकडून चंद्रकांत सानप रिंगणात आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे महेंद्र गर्जे, वैजिनाथ मिसाळ, वसंत सानप आदी सहा अपक्ष रिंगणात आहेत.

राष्ट्रवादीचा उमेदवार नाही
राष्ट्रवादीने काँग्रेसचे रवींद्र दळवी यांना अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून दिलीप भोसले आहेत. या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार नसला तरी अपक्ष तिघे रिंगणात आहेत. महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. भाजपकडून सुशिला पवार व प्रयागा साबळे तर शिवसेनेकडून कल्पना शेळके उमेदवार आहेत. दरम्यान, शनिवारी (ता. २०) मतदान होऊन नंतर मतमोजणी होईल.

संपादन - गणेश पिटेकर

loading image