esakal | रानडुकरांचा धुमाकूळ; दोन शेतकऱ्यांवर हल्ला, रात्र जागून काढावी लागतेय

बोलून बातमी शोधा

रानडुकर

रानडुकरांचा धुमाकूळ; दोन शेतकऱ्यांवर हल्ला, रात्र जागून काढावी लागतेय

sakal_logo
By
गणेश पिटेकर

किल्ले धारूर (जि.बीड) : तालुक्यातील असोला या गावात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अंबेजोगाई रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. धारूर परिसरा लगतच असलेल्या असोला व हसनाबाद गावात गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. हसनाबाद शिवारामध्ये आपल्या ज्वारीच्या शेतात शेळ्या चारणारे शेतकरी गोपीनाथ मनोहर खांडेकर यांच्यावर अचानकपणे भल्या मोठ्या रानडुकराने हल्ला केला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच गोपाळपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चांभार तांडा येथे धारूर येथील मजूर, रघुवीर सिंग हे शेतात कामासाठी गेले होते. परत येत असताना सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. हाताला चावा घेतल्याने त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रानडुकरांच्या हल्ल्यामुळे गोपाळपूर, असोला, हसणाबाद, जामगाव तांडा, चांभार तांडा येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांची यातून सुटका करावी अशी मागणी होत आहे.