नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हाभरात आंदोलने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीतर्फे वर्षश्राद्ध घालण्यात आले.

बीड - नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. आठ) एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नसून अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाभरात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आंदोलने केली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. तर शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीतर्फे वर्षश्राद्ध घालण्यात आले.

काँग्रेसचे धरणे आंदोलन
नोटाबंदीचा निर्णय तसेच जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने न केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या सर्व सेलच्या वतीने बुधवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून सरकारविरोधी आक्रोश मेळावा व धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले असून, या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना त्याची झळ सोसावी लागली. अनेकांचा रांगेतच मृत्यू झाला. यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडू नयेत, बिलापोटी मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतीमाल शासनाच्या बाजारभावाप्रमाणे महावितरणने घेऊन बिलापोटी चालू वर्षाचा पहिला हप्ता घ्यावा व मागील थकबाकी पूर्ण माफ करावी, दूध दर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३.५, ८.६ फॅट व डिग्रीस २७ रुपये दराप्रमाणे तालुका व जिल्हा संघाकडून प्राथमिक दूध संस्थेला भाव मिळवून द्यावा, मागासवर्गीयांचा विकास निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस समिती व काँग्रेसच्या सर्व सेलच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधी आक्रोश मेळावा व धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा मुख्य संघटक शहादेव हिंदोळे, विधी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. कृष्णा पंडित, तालुकाध्यक्ष महादेव धांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल साळवे, ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जाधव, महिला तालुकाध्यक्ष ॲड. प्रेरणा डोईफोडे, शहर उपाध्यक्ष संतोष निकाळजे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विरोधकांतर्फे माजलगावात निदर्शने
माजलगाव (बातमीदार) :  केंद्र सरकारने नोटाबंदीच्या माध्यमातून अवघा भारत तब्बल ५० दिवस वेठीस धरला. त्यानंतरही वर्ष सरले तरी या नोटाबंदीमुळे झालेल्या जखमांमधून सर्वसामान्य आजही सावरलेला नाही. नोटाबंदीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मानवी हक्क अभियानच्या वतीने काळा दिवस पाळून निषेध करण्यात आला; तसेच येथील शिवाजी चौकात बुधवारी(ता. ८) निदर्शने करण्यात आली.

नोटाबंदीच्या माध्यमातून सरकार काहीही साध्य करू शकले नाही. ज्या काळ्या पैशांसाठी सरकारने हा आटापिटा केला, त्यात शेकडो लोकांवर काळाने घाला घातला, सरकार लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत करू पाहत असल्याचा आरोप करत येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मानवी हक्क अभियानच्या ८ नोव्हेंबरचा दिवस काळा दिवस म्हणून पाळल्या गेला. तसेच येथील शिवाजी चौक येथे शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. काँग्रेसचे रशीद शेख, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी मधुकर कांबळे, खैरुल्ला खान, सिद्धार्थ खराडे, शेख जानुशाह, समियोद्‌दीन अन्सारी, शिवहर सेलूकर, अशोक ढगे, अफरोज तांबोळी, विवेक जाधव, नारायण शेजूळ, शंतनू सोळंके, प्रशांत शेटे, सागर पौळ, पवन मिसाळ, आयाज सय्यद, रमेश गवळी, माणिक शिंदे, जुबेर कादरी, शेख मुसा, पाशा पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी नोटाबंदीच्या वेळी मृत्यू पावलेल्या सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय रिपब्‍लिकन पक्षाची बीडमध्ये निदर्शने
नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. ८) एक वर्ष पूर्ण झाले असून, या निर्णयामुळे कोणतेही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा निर्णय झाल्याचा आरोप करीत या निर्णयाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (ता. ८) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे काळा पैसा संपुष्टात येईल, दहशतवादाला आळा बसून दहशतवाद्यांच्या पतपुरवठ्याला मर्यादा येतील, चलनातील बनावट नोटा हद्दपार होतील आदी आश्वासने नोटाबंदीनंतरही निरर्थक ठरली आहेत. याउलट, या निर्णयामुळे रोजागारांवर गंडांतर आले असून, महागाईतही वाढ झाली आहे. या निर्णयाचा अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुधवारी भारिपच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनांमध्ये जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, जिल्हा सरचिटणीस राहूल वाघमारे, संतोष जोगदंड, ॲड. सदानंद वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकरी संघटनेतर्फे कडा येथे प्रथम वर्षश्राद्ध
आष्टी (बातमीदार) - मोदी सरकारने केलेल्या चलन निश्‍चलीकरणाचा (नोटाबंदी) सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीतर्फे आज (ता. आठ) कडा येथे मौलालीबाबा दर्ग्यासमोर नदीपात्रात चक्क प्रथम वर्षश्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. 

नोटबंदीच्या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचा मोठा गाजावाजा सरकारतर्फे करण्यात आला; मात्र गेल्या वर्षभरात जनतेला फायदा होण्याऐवजी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या निर्णयाच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघटनेतर्फे कडा येथील मौलालीबाबा दर्ग्यासमोर नदीपात्रात वर्षश्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. 

या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख, रहेमान शेख, वामनराव ओव्हाळ, दादासाहेब राऊत, सागर बोराटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सुकाणू समितीने दिले श्राद्धाचे जेवण
केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवारी (ता. ८) एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयाचे दूरगामी विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले असून यामुळे अनेकांचा रोजगारही हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर महागाईचे संकट ओढावले असून नोटाबंदीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येईल, दहशतवाद्यांचा पतपुरवठा बंद होऊन दहशतवादाला आळा बसेल, चलनातील बनावट नोटा हद्दपार होतील आदी अपेक्षांचा नोटाबंदीनंतरही भंग झाला असून या निर्णयाचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला असून महागाईचा भडका उडाला. सर्वसामान्य माणसे नोटाबंदीनंतर रांगेत लागले असताना यामध्ये भांडवलदार मात्र दिसले नाहीत. यामुळे नोटाबंदीचे उद्दिष्ट सफल झाले नसल्याच्या सामान्यांच्या भावना आहेत. बीडमध्ये शेतकरी सुकाणू समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रा. सुशीला मोराळे, कुलदीप करपे, मोहन जाधव, धनंजय मोरे, राजू गायके, बाळासाहेब घुमरे, बी. डी. लोणकर, रोहिदास गायकवाड, राजेश कदम, किशोर राऊत, रोहिदास जाधव, सुनील पुरी, विठ्ठल कथले, प्रतीक्षा बोराडे, ज्योती वडमारे, मोहन गुंड व इतर सहभागी झाले होते.

Web Title: beed marathwada news agitation for currency ban oppose