जिल्हा बॅंक फसवणूकप्रकरणी पंडित पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

बीड - गढी (ता. गेवराई) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज, तारण ठेवल्यापैकी काही जमीन परस्पर विक्री करून जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, त्यांचे पुत्र आमदार अमरसिंह पंडित, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष जयसिंह पंडित यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालकांसह एकूण 28 जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिवाजीराव पंडित यांच्याविरुद्ध गुन्ह्याच्या निषेधार्थ गेवराईत आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

जयभवानी साखर कारखान्याने 2005 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून चौदा कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी जमीन गहाण ठेवली होती. कर्ज थकल्याने जिल्हा बॅंकेने कारखान्याला नोटीस पाठविली. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान, बॅंकेकडे गहाण ठेवल्यापैकी काही जमिनीच्या क्षेत्राचा व्यवहार झाला. जिल्हा बॅंकेच्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा कर्जवाटपाचे प्रकरण उघडकीस आल्यावर जयभवानी कारखान्याने तारण ठेवलेली काही जमीन परस्पर विकल्याचे उघडकीस आले. त्यावरून बारा वर्षे जुन्या प्रकरणात जिल्हा बॅंकेने फौजदारी कारवाईसाठी गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेतली. जिल्हा बॅंकेकडून चार दिवसांपूर्वीच ही तक्रार पोलिस ठाण्यात आली होती. पोलिसांनी तक्रार अर्ज चौकशीसाठी ठेवला होता. अखेर आज पहाटे संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती गेवराईचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली.

पंकजा मुंडेंचा निषेध
बीड - जयभवानी साखर कारखान्याच्या कर्जापोटी गहाण ठेवलेली जमीन परस्पर विकून जिल्हा बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळातील 28 जणांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेवराई शहरात तसेच तालुक्‍यात तीव्र पडसाद उमटले. पंडितांच्या समर्थनार्थ गेवराई शहरात सकाळपासून दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त करीत पालकमंत्री पंकजा मुंडेंना यासाठी जबाबदार धरीत त्यांचा निषेध केला. दरम्यान, आमदार पंडित यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट
पंडित पिता- पुत्रांसह 28 जणांविरुद्ध गुन्हे नोंद झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पहाटेच वाऱ्यासारखे पसरले आणि थंडीच्या वातावरणातील राजकीय वातावरण मात्र गरम बनले. सोशल मीडियावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात सकाळपासूनच पंडित समर्थकांच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत. "ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांच्यावर या वयात अशा प्रकारची कारवाई करायला नको होती. पंडित समर्थक व मराठा समाज कदापि माफ करणार नाही' असा इशाराही काही पोस्टमधून पंडित समर्थकांनी पालकमंत्र्यांना दिला. याशिवाय आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या फेसबुक पेजवरूनही पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. काही जणांनी सुडाच्या राजकारणाकडे लक्ष वेधले आहे.

विरोधकांचा कुटिल डाव - अमरसिंह पंडित
काही वर्षांपासून बंद असलेल्या जयभवानी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकतीच सुरवात करण्यात आली. या हंगामात व्यत्यय यावा यासाठी विरोधकांनी हा कुटिल डाव रचल्याची प्रतिक्रिया आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली.

Web Title: beed marathwada news district bank cheating case crime