सलग दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

माजलगाव तालुक्‍यात सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस

बीड - मधल्या काळात उघडीप दिलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून पुन्हा जोर धरला आहे. शनिवारीही (ता. नऊ) बीडसह काही भागात जोरदार पाऊस झाला. शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळित झाले. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.४५ (५१६.१० मिलिमीटर) पाऊस झाला.

माजलगाव तालुक्‍यात सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस

बीड - मधल्या काळात उघडीप दिलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून पुन्हा जोर धरला आहे. शनिवारीही (ता. नऊ) बीडसह काही भागात जोरदार पाऊस झाला. शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळित झाले. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.४५ (५१६.१० मिलिमीटर) पाऊस झाला.

जिल्ह्यात जूनमध्ये सर्वत्र पाऊस झाला. त्यानंतर काही काळ उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले; मात्र पुन्हा जोरदार पाऊस होऊन बहुतेक जलस्रोत तुडुंब भरले आहेत. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर गणेशोत्सवात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर नित्याने पाऊस सुरूच आहे.

शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर शनिवारीही दुपारी अनेक भागात पाऊस झाला. शनिवारी सकाळपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७७.४५ टक्के एवढा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ११.६० मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्‍यात ३४ मिलिमीटर, तर केजमध्ये २४, वडवणी तालुक्‍यात १८, अंबाजोगाई तालुक्‍यात १६ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिलिमीटर असून आतापर्यंत ५१६.१० मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.  

बीडमध्ये जनजीवन विस्कळित
दरम्यान, शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित झाले. ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत पाऊस झाल्यानंतर भाजी मंडईला डबक्‍याचे स्वरूप आले. त्यामुळे पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. सुभाष रोड, सहयोगनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहूनगर, स्वराज्यनगर आदी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांना छोट्या तलावाचे स्वरूप आले. यातून वाट काढताना पादचारी आणि वाहनचालकांना कसरत करावी लागली.

नागापूरचे वाण धरण भरले तुडुंब

परळी वैजनाथ - परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. शनिवारी (ता.९) सायंकाळच्या सुमारास धरणात ८६.३५ टक्के पाणीसाठा झाला.

अंबाजोगाई तालुक्‍यात असलेल्या वाण धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती. शनिवारी (ता.९) सायंकाळी धरणामध्ये ८६.३५ टक्के पाणी साठले होते. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुढील वर्षभराचा परळीचा पाणीप्रश्न सुटणार आहे. पाण्याची आजची आवक लक्षात घेता व पाण्याचा प्रवाह धरणाच्या दिशेने चालू असल्याने रविवारी कोणत्याही क्षणी वाण प्रकल्प ओसंडून वाहण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.

Web Title: beed marathwada rain